ब्राझीलमध्ये ‘नार्को-टेररिजम’ विरोधात मोठी कारवाई
पोलिसांच्या कारवाईत 64 ठार : 2500 जवान तैनात
वृत्तसंस्था/ रियो डी जेनेरिया
ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये मंगळवारी नार्को टेररिजमविरोधात मोठी मोहीम उघडण्यात आली. ब्राझीलच्या इतिहासात आतापर्यंतची सर्वात मोठी पोलीस कारवाई करण्यात आली असून यात कमीतकमी 64 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 4 पोलीसही सामील आहेत. ही कारवाई संघटित गुन्हेगारी नेटवर्कच्या विरोधात करण्यात आली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रs हस्तगत केली आहेत. ही मोहीम मागील एक वर्षापासून आखण्यात येत होती. या मोहिमेत 2500 हून अधिक जवान सामील होते. पुढील आठवड्यात रियोमध्ये सी40 वर्ल्ड मेयर्स क्लायमेट समिट आयोजित होणार असून त्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आल्याचे रियो डी जेनेरियोचे गव्हर्नर क्लाउडियो कास्त्राs यांनी सांगितले आहे.
रियोच्या अलेमाओ आणि पेनहा फवेला क्षेत्रांमध्ये कोमांडो वर्मेल्हो नावाच्या टोळीच्या कारवाया रोखण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली आहे. ही टोळी ब्राझीलमधील सर्वात जुनी आणि धोकादायक गुन्हेगारी संघटना आहे. या टोळीची सुरुवात 1970 च्या दशकात तुरुंगांमधून झाली होती. ही टोळी आता अमली पदार्थांची तस्करी, खंडणीवसुली आणि हिंसक गुन्ह्यांमध्ये सामील एक ट्रान्सनॅशनल क्रिमिनल नेटवर्क ठरली आहे.