आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात मोठी पडझड
पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम : आयटी समभागात मोठी विक्री
वृत्तसंस्था, मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील अंतिम सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी यांचे निर्देशांक मोठ्या घसरणीसह बंद झाले आहेत. मागील तीन दिवसात घसरण कायम राहिल्याचे दिसून आले. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स जवळपास 999.79 अंकांनी कोसळून निर्देशांक 76,664.21 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 275.10 अंकांच्या घसरणीसह 23,897.95 वर बंद झाला आहे.
जागतिक पातळीवरील युद्धजन्य स्थितीमुळे चालू आठवड्यातील अंतिम सत्रात अमेरिका आणि इराण यांच्यामधील नाकेबंदीवरुन सुरु असलेल्या वातावरणामुळे कच्चा तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. या घटनेचा नकारात्मक परिणाम म्हणून शुक्रवारी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका कायम ठेवली आहे. यासोबतच आयटी समभागांमध्ये झालेल्या मोठ्या पडझडीचा परिणामही भारतीय बाजारावर राहिला आहे.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने आयटी क्षेत्रातील इन्फोसिस, टीसीएस आणि टेक महिंद्रा यांचे समभाग सर्वाधिक घसरणीत राहिले आहेत. तर निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉलकॅप यांचे निर्देशांकही 0.96 टक्के आणि 0.87 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत.
या क्षेत्रांमध्ये प्रभाव
बाजारात औषध आणि मीडियायासह आयटी क्षेत्रामधील कंपन्यांमध्ये मोठी घसरण राहिली. याचा थेट परिणाम हा भारतीय बाजारावर झाला. धातू क्षेत्राने मात्र सकारात्मक कामगिरी केली आहे.
जागतिक बाजारांची स्थिती
आशियातील बहुतांश बाजारांमध्ये घसरणीचा कल राहिला होता. कारण अमेरिका आणि इराण यांच्यामधील तणाव वाढण्याच्या बातमीमुळे कोस्पी आणि हॅँगसेंग यांचे निर्देशांक 0.22 ते 0.45 टक्क्यांनी घसरणीत राहिले. जपानचा निक्केई हा मात्र 0.55 टक्क्यांनी वधारला होता.
कच्च्या तेलाचे गणित बिघडले
ब्रेंट कच्चे तेल हे 100 डॉलर प्रतिबॅरेलच्या वरती पोहोचले आहे. यासोबतच अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत्या तणावामुळे ऊर्जा क्षेत्रासह खनिज तेलाचा पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने याचा मोठा फटका हा भारतीय बाजारावर होत असल्याचे चित्र आहे.