अमेरिकन शहरांमध्ये सुरक्षेत मोठी वाढ
गुप्तचर यंत्रणांकडून तपास यंत्रणांना अचूक अपडेट्स
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
इराणच्या तीन अणुतळांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन डीसीसह अमेरिकेतील अनेक प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अमेरिका इराणमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सुरक्षा संस्थांसोबत गुप्त माहिती सामायिक केली जात असल्याचे न्यूयॉर्क पोलीस विभागाने सांगितले. सध्या शहराला कोणताही थेट धोका दिसत नाही, परंतु त्यांनी धार्मिक स्थळांवरील सुरक्षा पूर्वीपेक्षा अधिक वाढवली आहे. अमेरिकन गुप्तचर यंत्रणा अधिकाधिक सक्रिय झाली असून सर्व तपास यंत्रणांना अचूक अपडेट्स पुरविले जात आहेत.
अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी देशाला संबोधून भाषण केले आहे. आपल्या अवघ्या तीन मिनिटांच्या भाषणात ट्रम्प यांनी केवळ हल्ल्याविषयी माहिती देताना इराणला धमकीवजा इशारे दिल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘आम्ही इराणमधील तीन अणुसुविधांवर आमचा यशस्वी हल्ला पूर्ण केला आहे, ज्यात फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान यांचा समावेश आहे. आता शांततेची वेळ आली आहे!’, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.