For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मेजर जनरल ‘पेंग्विन’

06:10 AM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
मेजर जनरल ‘पेंग्विन’
Advertisement

युरोप खंडातील नॉर्वे या देशात एका ‘पेंग्विन’ला मेजर जनरल ही श्रेणी देऊन त्याचा सन्मान करण्यात आला आहे. या देशातील ‘किंग्ज गार्ड बँड अँड ड्रिल’ या संघाने त्याला ही श्रेणी प्रदान केली आहे. या पेंग्विनचे वास्तव्य एडिनबर्गच्या प्राणीसंग्रहालयात असते. अनेक प्रकारच्या परीक्षा घेतल्यानंतर या पेंग्विनची निवड या श्रेणीसाठी करण्यात आली, अशी माहिती देण्यात आली आहे. या पेंग्विनचे नाव नील्स ओलाव असे असून त्याला ‘सर’ ही उपाधीही प्राप्त झालेली आहे. त्याला केवळ ‘मेजर जनरल’ ही श्रेणी मिळालेली आहे, असे नाही. या श्रेणीसमवेत त्याला ‘बॅरन ऑफ द बोवेट आयलंडस्’ ही उपाधीही प्रदान करण्यात आली आहे. या पेंग्विनने यापूर्वीच ‘ब्रिगेडियर’ होण्याचा मानही मिळविलेला आहे.

Advertisement

या पेंग्विनला अशा प्रकारे सैनिकी श्रेणी देऊन का गौरविण्यात येते, असा प्रश्न अनेकांना पडण्याची शक्यता आहे. तर ही नॉर्वे देशातील प्रथा आहे. या पेंग्विनला 1972 मध्ये एडिनबर्ग प्राणीसंग्रहालयाने ‘दत्तक‘ घेतले आहे. त्याचे नाव नॉर्वे देशाचे तत्कालीन सम्राट किंग ओलाव आणि सुप्रसिद्ध सेनाधिकारी मेजर नील्स एगेलियन यांच्या नावांचे एकत्रिकरण करुन ‘नील्स ओलाव’ असे ठेवण्यात आले होते. हा पेंग्विन नॉर्वे देशात कौतुकाचा विषय आहे. त्याला आत्तापर्यंत आठ सैनिकी सन्मान प्राप्त झालेले आहेत. ‘मेजर जनरल’ ही श्रेणी प्राप्त झाल्यानंतर ‘सर नील्स ओलाव’ यांचा मोठा सत्कार करण्यात आला. नॉर्वेच्या एका भूसेना तुकडीने त्याला संचलन करुन मानवंदना दिली. ही मानवंदना या पेंग्विननेही मोठ्या थाटात दोन पायांवर उभे राहून स्वीकारल्याचे दिसून आले. मानवंदनेच्या कार्यक्रमाच्या आधी त्याला मेजर जनरल या पदाचा बॅज लावण्यात आला. नॉर्वेच्या अनेक नागरीकांनी हा श्रेणीदान समारंभ टीव्हीवरुन पाहिला. त्याला मानवंदना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या संचलनात 160 सैनिक समाविष्ट झाले होते. सर नील्स ओलाव यांना 1982 मध्ये कॉर्पोरल, 1987 मध्ये सार्जंट, 1993 मध्ये रेजिमेंटल सार्जंट मेजर, 2001 मध्ये ऑनरेबल रेजिमेंटल सार्जंट मेजर, 2005 मध्ये कर्नल-इन-चीफ, 2008 मध्ये नाईटहुड, 2016 मध्ये ब्रिगेडियर सर आणि आता मेजर जनरल अशा श्रेणी आत्तापर्यंत मानाने प्रदान करण्यात आल्या आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.