For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रपती पेजेश्कियान यांच्या अधिकारांमध्ये मोठी कपात

06:14 AM Aug 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रपती पेजेश्कियान यांच्या अधिकारांमध्ये मोठी कपात
Advertisement

इराणसोबत चर्चा जारी : ट्रम्प यांच्या पुढील पावलाविषयी सर्वांना प्रतीक्षा

Advertisement

इराणमध्ये राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांच्या अधिकारांमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. देशाचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी सुरक्षा आणि विदेश धोरणाशी निगडित महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये राष्ट्रपतींची भूमिका मर्यादित केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा, आण्विक कार्यक्रम आणि अमेरिकेसोबत चर्चा यासारख्या मोठ्या मुद्द्यांवर आता आयआरजीसी कमांडर अहमद वाहिदी यांचा निर्णय अंतिम मानला जाणार आहे. म्हणजेच या प्रकरणांमध्ये राष्ट्रपतींची मंजुरी निर्णायक राहणार नाही.

 वृत्तसंस्था, तेहरान

Advertisement

पेजेश्कियान दीर्घकाळापासून आपल्या सरकारला मोठ्या निर्णयांपासून दूर ठेवले जात असल्याची तक्रार करत होते. यापूर्वी त्यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शविली होती. तर आता रणनीतिक निर्णय सैन्याच्या सल्ल्यानुसारच घेतले जातील असे सर्वोच्च नेत्याने स्पष्ट केले आहे.

अमेरिका-इराण चर्चेची तारीख अद्याप अनिश्चित

अमेरिका आणि इराणदरम्यान प्रस्तावित चर्चेवरून अद्याप तारीख अन् स्थान निश्चित झालेले नाही. पाकिस्तान आणि कतार संभाव्य यजमान देशांच्या स्वरुपात चर्चेत आहेत आणि दोन्ही देश मध्यस्थीसाठी प्रयत्न करत आहेत.

इराणची नवी रणनीति

इराण आता थेट सैन्य विजयाऐवजी सागरी व्यापार, तेलपुरवठा आणि महत्त्वपूर्ण शिपिंग मार्गांवर दबाव निर्माण करत अमेरिका आणि त्याच्या सहकाऱ्यांचा खर्च वाढविण्याची रणनीति अवलंबित आहे. आयआरजीसीने होर्मुझ सामुद्रधुनीवर उ•ाण करत असलेल्या एमक्यू-9 रीपर ड्रोनला नष्ट केल्याचा दावा केला आहे.

नव्या पर्यायांचा शोध

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने स्वत:च्या सैन्य विश्लेषकांकडून इराणवर दबाव वाढविणे आणि त्याला शिक्षा करण्यासाठी नव्या सूचना मागविल्या आहेत. अधिकाऱ्यांनी याला असामान्य पाऊल ठरविले आहे.

6 सौदी सुपरटँकर्सनी बदलला मार्ग

येमेनच्या हुती बंडखोरांच्या धमकीनंतर सौदी अरेबियाच्या 6 सुपरटँकर्सनी लाल समुद्र आणि बाब-अल-मंदेबऐवजी आफ्रिकेच्या दक्षिण हिस्स्यातून लांब सागरी मार्ग अवलंबिला आहे. यामुळे क्षेत्रातील जहाजवाहतुकीच्या सुरक्षेवरून चिंता वाढली आहे.

युद्ध लांबविण्याची इच्छा नाही

इराण हे युद्ध जारी ठेवू इच्छित नाही तसेच ते पुढे नेऊ इच्छित नाही. परंतु आमच्या देशाच्या सुरक्षेला धोका उदभवला तर इराण स्वत:च्या सीमांचे रक्षण करणार आहे. गल्ल्यांमधील भांडण असो किंवा दोन देशांमधील लढाई, युद्ध एका आजाराप्रमाणे आहे. आम्ही आमच्या सीमांचे रक्षण करू, परंतु युद्ध वाढविण्याची इच्छा नाही असे इराणचे राष्ट्रपती पेजेश्कियान यांनी म्हटले आहे.

राजीनामा देणार नाही

पेजेश्कियान यांनी राजीनाम्याचे वृत्त फेटाळत पद सोडणार नसल्याचे एका मुलाखतीत सांगितले आहे. पेजेश्कियान यांनी 28 वेळा राजीनामा देण्याची धमकी दिल्याचा दावा वरिष्ठ धर्मगुरु मोहम्मद-बाकर खर्राजी यांनी केला होता.

तुर्कियेच्या अध्यक्षांसोबत चर्चा

सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी तुर्कियेचे अध्यक्ष रेसेप तैयब एर्दोगान यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. दोन्ही नेत्यांनी लाल समुद्रातील हुती बंडखोरांचे वाढते हल्ले आणि क्षेत्रीय सुरक्षा स्थितीवर चर्चा केली आहे. एर्दोगान यांनी लाल समुद्रात जहाजांवरील हुतींच्या हल्ल्यांची निंदा केली. सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील बहुराष्ट्रीय सागरी सुरक्षा आघाडीचे समर्थन एर्दोगान यांनी केले आहे.

दीर्घ युद्धाची भीती

अमेरिका आणि इराणदरम्यान जारी तणावावरून आखाती देशांची चिंता वाढली आहे. हा संघर्ष कुठल्याही निष्कर्षावर पोहोचण्याऐवजी दीर्घ युद्धात रुपांतरित होऊ शकतो अशी भीती या देशांना वाटतेय. युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा इराणला कठोर इशारा दिला आहे. प्रत्येकवेळी सैन्य कारवाईबद्दल वक्तव्य केले जाते, मग मध्यस्थ देशांच्या माध्यमातून दोन्ही बाजूंदरम्यान चर्चा सुरू होत आहे.

Advertisement
Tags :

.