For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वी काँग्रेससाठी मोठे संकट

06:08 AM Apr 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वी काँग्रेससाठी मोठे संकट
Advertisement

 सुरतमधील उमेदवाराचा अर्ज रद्द होण्याचे संकेत

Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी सुरतमध्ये काँग्रेससमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. सुरत मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाणी यांचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये रद्द होण्याचे संकेत मिळत आहेत. अर्जावरील प्रस्तावकांच्या सह्यांमध्ये गफलत असल्याचा संशय व्यक्त करत भाजपचे माजी उपमहापौर दिनेश जोधानी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांनी कुंभाणी यांना कार्यालयात बोलावून नामनिर्देशनपत्राची तपासणी करत त्यांचा अर्ज रद्द झाल्याची तोंडी माहिती दिली. उमेदवारी अर्जावरील स्वाक्षऱ्यांबाबत साशंकता व्यक्त झाल्यानंतर कुंभाणी यांनी एक दिवसाची मुदत मागून घेतली आहे. त्यानुसार रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत प्रस्तावकांसह कार्यालयात येण्याचे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत. कुंभाणी यांच्या उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी करणारे प्रस्तावक सध्या गायब असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

सुरतमधील पक्षाचे उमेदवार नीलेश कुंभाणी यांच्या उमेदवारी अर्जावरून नाट्यामय घडामोडी घडल्या आहेत. कुंभाणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एक दिवसाची वेळ मागून घेत आता तातडीने सुनावणीसाठी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. सुरतमधून नीलेश कुंभाणी यांचे डमी उमेदवार म्हणून सुरेशभाई पडसाळा यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. कुंभाणी यांचा अर्ज रद्द झाल्यास पडसाळा काँग्रेसच्यावतीने सुरतमधून निवडणूक लढवू शकतात. सुरत लोकसभा जागेसाठी एकूण 24 अर्ज आयोगाकडे प्राप्त झाले आहेत.

काँग्रेसच्या उमेदवाराने आपली बाजू मांडण्यासाठी वेळ मागितला आहे. रविवार, 21 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता काँग्रेसचे उमेदवारी अर्ज निश्चित करण्यात येणार आहेत. कुंभाणी यांचा उमेदवारी अर्ज रद्द होण्याच्या शक्मयतेबाबत भाजपने प्रशासनाचा गैरवापर केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. उमेदवारी रद्द झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याची काँग्रेसची तयारी आहे. यावेळी भाजपने सुरतमधून मुकेशभाई दलाल यांना उमेदवारी दिली आहे. आतापर्यंत दर्शना जरदोश या सुरतच्या खासदार होत्या.

फॉर्म पडताळणीमध्ये ट्विस्ट

गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा 19 एप्रिल हा शेवटचा दिवस होता. यानंतर 20 एप्रिल रोजी अर्जांची छाननी झाली. दरम्यान, निलेश कुंभाणी यांच्या अर्जात 3 प्रस्तावकांच्या सह्या नसल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले. यानंतर त्यांचा अर्ज रद्द झाल्याचा प्रकार समोर आला. आता काँग्रेस उमेदवाराने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांकडे एक दिवसाची वेळ मागितली आहे. आता आज सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्जावर निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. काँग्रेसला एक दिवसाची मुदत देण्यात आल्याचा दावा कुंभाणी यांच्या वकिलांनी केला असून अधिकारी आमचे म्हणणे ऐकून निर्णय घेतील, असे स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.