बागपतमध्ये मोठी दुर्घटना, 7 भाविकांचा मृत्यू
मंच तुटल्याने घडली दुर्घटना : 80 जण जखमी
वृत्तसंस्था/ बागपत
उत्तरप्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील बडौत येथे मंगळवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. भगवान आदिनाथ यांच्या निर्वाण ल•t पर्वावर मानस्तंभ परिसरात लाकडाने तयार करण्यात आलेला मंच कोसळला आहे. या कोसळलेल्या मंचाखाली सापडून सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 2 महिलांसमवेत 5 जणंचा समावेश असून 80 पेक्षा अधिक भाविक जखमी झाले आहेत. यावेळी मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यास लोकांनी विरोध केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
बडौत शहरात श्री दिगंबर जैन पदवी महाविद्यालयाच्या मैदानावर निर्माण करण्यात आलेला मानस्तंभाचा लाकडाने तयार करण्यात आलेला मंच तुटला. या मंचाखाली सापडून 7 जणांना जीव गमवावा लागला असून 80 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मंगळवारी निर्वाण महोत्सवाच्या अंतर्गत तेथे धार्मिक कार्यक्रम आयोजित होणार होता. याकरता 65 फूट उंच मंच तयार करण्यात आला होता. भाविक मानस्तंभ येथे विराजमान पुतळ्याचा अभिषेक करण्यासाठी लावण्यात आलेल्या तात्पुरत्या जिन्यावर चढू लागताच तो कोसळला. यामुळे 80 हून अधिक भाविक त्याखाली चिरडले गेले. यातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटना होताच भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली, जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बागपत जिल्ह्यात दाखल झालेल्या दुर्घटनेची दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी जखमी भाविकांना तत्काळ रुग्णालयात पोहोचवून योग्य उपचार करविण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. तसेच जखमी लवकर बरे व्हावेत याकरता प्रार्थनाही केली आहे. प्रशासनाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि जखमींना शक्य ती मदत केली जात असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी पंकज वर्मा यांनी सांगितले आहे.