लखनौ विमानतळावर मोठी दुर्घटना टळली
पायलटच्या प्रसंगावधानामुळे 121 प्रवासी बचावले
वृत्तसंस्था/ लखनौ
लखनौ विमानतळावर रविवारी एक मोठी दुर्घटना टळली. लखनौमधून दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान (6ई-2111) टेकऑफसाठी धावपट्टीवर धावत असतानाच अचानक पायलटने आपत्कालीन ब्रेक लावून विमान थांबवले. प्रत्यक्षात टेकऑफच्या अगदी आधी इंजिनला पुरेसा जोर मिळत नसल्यामुळे सुरक्षितता लक्षात घेऊन पायलटने विमान थांबवण्याचा निर्णय घेतला. या विमानात सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या खासदार पत्नी डिंपल यादव यांच्यासह 151 प्रवासी होते. अचानक उ•ाण थांबवल्याने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. विमान थांबल्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अन्य विमानाने प्रवाशांना दिल्लीला पाठवण्यात आले. इंडिगोने याला तांत्रिक बिघाड असल्याचे म्हटले असले तरी पायलटच्या सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.