कुडाळला उद्या ''माझा लोकराजा'' महोत्सव
दशावतार नाटक,ज्येष्ठ कलाकारांचे सत्कार, गुणवंत विद्यार्थी गौरव.
कुडाळ -
कुडाळ तालुका पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघटनेच्यावतीने 23 जून रोजी कुडाळ येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिराच्या रंगमंचावर माझा लोकराजा महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. रक्तपिपासू रक्ताक्षी नाटक, ज्येष्ठ कलाकारांचा सत्कार व विद्यार्थी गुणगौरव आदी कार्यक्रम होणार आहेत.महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे. दशावतार लोककलेत आपल्या अभिनय चातुर्याने नावलौकिक मिळविला. राजपार्ट आणि अन्य विविध भूमिका अजरामर केल्या. आपल्या अभिनयाच्या जोरावर ज्यांनी नाट्य रसिकांना आपलेसे करून घेतले. रसिकांनी ज्यांना लोकराजा ही पदवी दिली.ते ज्येष्ठ दशावतार कलाकार स्व.सुधीर कलिंगण यांच्या स्मृती प्रित्यर्थ कुडाळ तालुका पारंपारिक दशावतारी कलाकार बहुउद्देशीय संघटनेतर्फे माझा लोकराजा महोत्सव दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला. या महोत्सवाच्या यंदाच्या तिसऱ्या वर्षी तालुक्यातील दशावतारातील कलाकारांच्या संचात रक्तपिसासू रक्ताक्षी नाटक तसेच तालुक्यातील ज्येष्ठ कलाकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. दुपारी 3.30 वाजता उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाला आमदार नीलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी ज्येष्ठ दशावतार कलाकार स्व.महादेव लोट व दशावतारातील ज्येष्ठ पखवाज वादक स्व.अशोक नेरुरकर यांच्या कुटुंबीयांचा सत्कार तसेच दशावतारातील ज्येष्ठ कलाकार सुरेश धुरी ,प्रकाश आकेरकर व पंढरीनाथ सामंत यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सायंकाळी 4 वाजता दहावी -बारावी परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव , 4.30 वाजता कुडाळ तालुक्यातील दशावतार कलाकारांच्या संचात रक्तपिसासू रक्ताक्षी नाटक होणार आहे.यात गणपती - राजा शिरपुटे ,रिद्धी - दीपक राऊत, सिद्धी - बबन घोगळे ,शुक्राचार्य मिलिंद नाईक, हिरण्यम - सुनील खोर्जुवेकर ,नारद - पंढरीनाथ घाटकर,रक्ताक्षी - बंड्या परब, विभीषण - राधाकृष्ण ( बाबली ) नाईक ,राम - विलास तेंडोलकर ,भरत - रोहन चव्हाण, शत्रुघ्न - रोशन चव्हाण,चंद्रकेतु - बाळू मांजरेकर,मारुती - संदेश वेंगुर्लेकर ,गावकर - कृष्णा घाटकर , गावकरीण - रवी सावंत आदी कलाकार आहेत,तर हार्मोनियम प्रकाश सावंत व यश बांबर्डेकर ,पखवाज -अर्जुन सावंत व प्रमोद घावनळकर , झांज - शानु चव्हाण व सुहास बांबर्डेकर यांची संगीतसाथ आहे. या महोत्सवाला उपस्थित राहावे,असे आवाहन कुडाळ तालुका पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघटनेचे अध्यक्ष चारुदत्त तेंडोलकर,सचिव नीलकंठ सावंत तसेच अन्य पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.