For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माजगाव रमाईनगरचा जीर्ण पूल धोकादायक; तातडीने दुरुस्तीची मागणी;माजी पं. स. सदस्य बाबू सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वेधले लक्ष; 11 सप्टेंबरनंतर काम सुरू करण्याचे आश्वासन

माजगाव रमाईनगरचा जीर्ण पूल धोकादायक  तातडीने दुरुस्तीची मागणी माजी पं  स  सदस्य बाबू सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वेधले लक्ष  11 सप्टेंबरनंतर काम सुरू करण्याचे आश्वासन
Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी : माजगाव रमाईनगर येथील जीर्ण झालेला पूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत असून, पुलाला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. सिमेंट-काँक्रीट उखडल्याने या पुलावरून दररोज ये-जा करणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Advertisement

या गंभीर समस्येची दखल घेत माजी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण अर्जुन सावंत उर्फ बाबू सावंत यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. पुलाची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे सुरू करावीत, अशी मागणी त्यांनी केली.

विशेष म्हणजे, मंत्री नितेश राणे यांनी या पुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिलेला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वीही याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता; मात्र ठोस कार्यवाही न झाल्याने आता सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.

Advertisement

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येत्या 11 सप्टेंबर रोजी निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्यानंतर पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पुलाची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असल्याने शाळकरी विद्यार्थी, दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने आश्वासनाची पूर्तता करून विलंब न करता प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण अर्जुन सावंत उर्फ बाबू सावंत, माजी सरपंच दिनेश सावंत, अजय सावंत, माजगाव पोलीस पाटील विनोद जाधव, माजी उपसरपंच संजय कानसे आणि उपसरपंच रिचर्ड डिमेलो उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.