शासकीय निधीची वाट न पाहता स्वखर्चातून माजगाव-कुंभारवाडी रस्त्याचे काँक्रिटीकरण; पंचायत समिती सदस्य जितू गावकर यांची अनोखी बांधिलकी
ओटवणे / प्रतिनिधी : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला माजगाव-कुंभारवाडी ते संत गोरा कुंभार मंदिर या महत्त्वाच्या रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. शासकीय निधीची प्रतीक्षा न करता माजगावचे पंचायत समिती सदस्य जितू गावकर यांनी स्वखर्चातून या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. या कामाचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला.
खराब आणि खड्डेमय रस्त्यामुळे कुंभारवाडी परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण अथवा काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी ग्रामस्थांची सातत्याने मागणी होती. याबाबत ग्रामस्थांनी पंचायत समिती सदस्य जितू गावकर यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची ग्वाही दिली होती.
शासकीय निधी मंजूर होण्याची प्रतीक्षा न करता लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी ओळखून गावकर यांनी स्वतःच्या खर्चातून रस्ता पक्का करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या निर्णयामुळे कुंभारवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
‘आश्वासनांपेक्षा कृती महत्त्वाची’
केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून काम करणारा लोकप्रतिनिधी म्हणून जितू गावकर यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या प्रश्नाची तातडीने दखल घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. त्यांच्या या कार्यतत्परतेचा इतर लोकप्रतिनिधींनी आदर्श घ्यावा, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी बाबुराव तेंडुलकर, माजगावचे माजी उपसरपंच राजन पाटकर, सामाजिक कार्यकर्ते बाबा भोगण, चंद्रकांत तळवडेकर, संतोष बांदेकर, दीपक पाटकर, सुरेश पाटकर, मोहन मांजरेकर, नितीन तळवडेकर, जयेश पावसकर यांच्यासह कुंभारवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.