डुलकी लागल्याने आयशर टेम्पो घराच्या कठड्यावर आदळला; माजगाव-साधले वडापाव सेंटरजवळ मध्यरात्रीची घटना
ओटवणे : चालकाला डुलकी लागल्याने नियंत्रण सुटलेला आयशर टेम्पो रस्त्यालगतच्या घराच्या कठड्यावर आदळल्याची घटना मुंबई-गोवा जुन्या महामार्गावरील माजगाव-साधले वडापाव सेंटरजवळील धोकादायक वळणावर मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, टेम्पोसह घराच्या कठड्याचे मोठे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो मध्यरात्रीच्या सुमारास माजगाव-साधले वडापाव सेंटरजवळ आला. यावेळी चालकाला डुलकी लागल्याने टेम्पोवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर टेम्पो रस्त्यालगत असलेल्या घराच्या कठड्यावर जोरदार आदळला.
धडकेचा आवाज एवढा मोठा होता की, घरमालक बस्त्याव परेरा यांच्यासह कुटुंबीय खडबडून जागे झाले. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने घरातील तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या कोणालाही दुखापत झाली नाही.
या अपघातात आयशर टेम्पोचे नुकसान झाले असून, घराच्या कठड्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी असलेल्या धोकादायक वळणावर वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.