मका खरेदी मर्यादा 50 क्विंटलपर्यंत वाढविली
प्रतिनिधी/ बेंगळूर
मका खरेदी आदेशात राज्य सरकारने रविवारी सुधारणा केली आहे. आधारभूत दर योजनेंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याकडून खरेदी करता येणारी मक्क्याची मर्यादा वाढविली आहे. प्रति शेतकरी 20 क्विंटलची पूर्वीची मर्यादा 50 क्विंटलपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे सरकारी आदेशानंतर जारी केलेल्या सुधारणांमध्ये म्हटले आहे.
प्रुट सॉफ्टवेअरमध्ये नोंदवलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या क्षेत्रफळाच्या आधारे, प्रत्येक शेतकऱ्याकडून 50 क्विंटलपर्यंत मका खरेदी करता येईल. प्रति क्विंटलला 2,400 ऊपये आधारभूत किंमत दिली जात आहे. हे 12 क्विंटल प्रति एकर म्हणून मोजले जाते. डिस्टिलरीजजवळ असलेल्या प्राथमिक कृषी पतसंस्थांद्वारे (पीएसीएस) खरेदी करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे. राज्य सरकारने खरेदी केंद्रांमधून शेतकऱ्यांनी पिकवलेला मका आधारभूत किमतीवर खरेदी करावा, अशी मागणी करत धारवाड, नवलगुंद, कुंदगोळ आणि राज्यातील इतर भागातील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले होते. याची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आली आहे.