सीमाप्रश्नासाठी शेवटपर्यंत एकजूट राखा!
अॅड. राजाभाऊ पाटील यांचे आवाहन : हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन : मराठी भाषिकांकडून पारंपरिक मार्गावरून फेरी
प्रतिनिधी/ बेळगाव
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना शनिवार दि. 17 रोजी म. ए. समितीतर्फे अभिवादन करण्यात आले. त्यावेळी अॅड. राजाभाऊ पाटील बोलत होते. प्रारंभी हुतात्मा चौक येथे महाराष्ट्र एकीकरण समिती व उपस्थित मराठी भाषिकांच्या हस्ते हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अॅड. राजाभाऊ पाटील व शहर म. ए. समितीचे ज्येष्ठ सदस्य बी. ओ. येतोजी यांच्या हस्ते हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
फेरीमध्ये मोठ्या संख्येने मराठी भाषिक सहभागी झाले होते. अनसूरकर गल्ली येथे मधू बांदेकर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी महापौर सरिता पाटील, नगरसेविका वैशाली भातकांडे, शिवानी पाटील, सुधा भातकांडे यांच्या हस्ते झाले. बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेचे पूजन मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर व खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या हस्ते करण्यात आले. महादेव बारागडी यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेवक रवी साळुंके, शिवाजी मंडोळकर, ज्येष्ठ सदस्य नेताजी जाधव व येळ्ळूर ग्राम पंचायतचे माजी अध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते झाले. लक्ष्मण गावडा यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेविका वैशाली भातकांडे, माजी महापौर सरिता पाटील, माजी नगरसेविका सुधा भातकांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
सीमावासियांना मार्गदर्शन करताना अॅड. राजाभाऊ पाटील म्हणाले, पिढ्यान्पिढ्या चाललेला हा सीमाप्रश्नाचा लढा महाराष्ट्रात सामील झाल्यानंतरच थांबणार आहे. हीच खरी हुतात्म्यांना आदरांजली ठरेल. मागील चार वर्षात सीमाप्रश्नाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेबाबत महाराष्ट्र सरकार महत्त्वाची भूमिका घेत आहे. सीमाप्रश्नावर संसदेत निर्णय व्हावा, यासाठी मागणी केली जात आहे. जोवर निर्णय लागत नाही, तोवर हा लढा सुरूच ठेवावा लागेल. त्यासाठी आपली एकजूट अबाधित ठेवून यापुढेही आपल्या भाषेच्या राज्यात आनंदाने जावूया, असे त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन रणजित चव्हाण-पाटील यांनी केले. यावेळी म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर, शहर समितीचे किरण गावडे, अॅड. अमर येळ्ळूरकर, अॅड. महेश बिर्जे, सुनील बाळेकुंद्री, संजय शिंदे, मोतेश बार्देशकर, महेश जुवेकर, राजकुमार बोकडे, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके, रावजी पाटील, दत्ता उघाडे, राजू बिर्जे, शिवाजी हावळण्णाचे, आप्पासाहेब गुरव, श्रीकांत मांडेकर, श्रीकांत कदम, बापू जाधव, मदन बामणे, प्रकाश अष्टेकर, रमेश मेणसे, चंद्रकांत गुंडकल, सदानंद शिनोळकर, अनिल कुट्रे, गजानन पाटील, सचिन केळवेकर, सूरज कुडूचकर, राजू कदम, प्रतीक पाटील, वासू सामजी, उमेश पाटील, अमित देसाई, किरण हुद्दार, माजी नगरसेवक किरण परब, शिवाजी कुडूचकर, प्रशांत भातकांडे, विजय भोसले, मनोहर हलगेकर, राकेश पलंगे, मोहन बेळगुंदकर, अभिजीत मजुकर, बाबू कोले, आप्पाजी बस्तवाडकर, श्रीधर खन्नूकर, अनिल अमरोळे, शांताराम होसुरकर, ज्ञानेश्वर मण्णूरकर, प्रवीण रेडेकर, परशराम परीट, लक्ष्मण मेलगे, साईराज जाधव, विकास भेकणे, शेखर तलवार, रणजित हावळण्णाचे, मारुती मरगाण्णाचे, विनायक हुलजी यांच्यासह बहुसंख्येने सीमावासीय उपस्थित होते.
घोषणांनी दणाणला परिसर
अभिवादनानंतर पारंपरिक मार्गावरून फेरी काढण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी फेरीचा संपूर्ण परिसर दणाणून निघाला होता. ‘रहेंगे तो महाराष्ट्र में नही तो जेल में, नही चलेगी, नही चलेगी दादागिरी नही चलेगी’, मराठी भाषिकांवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या घोषणांनी सीमावासियांना बळ मिळत गेले. हुतात्मा चौक येथून फेरीला सुरुवात झाली. रामदेव गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसूरकर गल्ली, किर्लोस्कर रोड मार्गे हुतात्मा चौकात फेरीची सांगता झाली.