For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्राम पंचायत व्याप्तींमध्ये स्वच्छता राखा

11:14 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
ग्राम पंचायत व्याप्तींमध्ये स्वच्छता राखा
Advertisement

जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे : प्रत्येक 20 दिवसांनी जलकुंभ स्वच्छ करण्याची कर्मचाऱ्यांना सूचना 

Advertisement

बेळगाव : मान्सून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्वच्छतेवर अधिक भर देण्यात यावा, ग्राम पंचायतींच्या व्याप्तीतील गटारींची स्वच्छता करण्यात यावी, प्रत्येक 20 दिवसांनी जलकुंभ स्वच्छ करण्यात यावेत, सातत्याने पाण्याचे परीक्षण करण्यात यावे, गटारी आणि रस्त्यांवर कोठेही पाणी थांबू देऊ नये, याची दखल घेण्यात यावी, अशा सूचना जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी तालुका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केली. जिल्हा पंचायत सभागृहामध्ये बुधवारी तालुका पंचायत अधिकाऱ्यांची बैठक झाली. विविध योजनांच्या विकासकामांचा आढावा घेऊन ते बोलत होते. ग्राम पंचायत व्याप्तीमधील मालमत्तांचे सर्वेक्षण डाटा पिटू अंतर्गत आठवड्यामध्ये अपडेट करावे. या आर्थिक वर्षात 100 टक्के महसूल वसूल करण्यात यावा. यासाठी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी व ग्राम विकास अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. सकाल योजनेंतर्गत कालावधी पूर्ण होऊन शिल्लक असलेले अर्ज येत्या दोन दिवसांमध्ये निकालात काढण्यात यावेत. कोणत्याही कारणास्तव नागरिकांना त्रास होऊ नये याची दखल घेण्यात यावी. अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. याबरोबरच पंचायत डेव्हल्पमेंट इंडेक्शन प्रक्रिया येत्या दोन दिवसांत पूर्ण करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली.

नरेगा योजनेंतर्गत नागरिकांना काम उपलब्ध करून देण्यात यावे. तालुकानिहाय दिलेल्या उद्दिष्टानुसार प्रगती साधण्यात यावी. ग्राम पंचायतनुसार देण्यात आलेले कामाचे उद्दिष्ट संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्ण करावे. 2024-25 वर्षातील कामे रोजगार हमी योजनेंतर्गत पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे. शाळेतील स्वच्छतागृह, खेळाचे मैदान, शाळेतील स्वयंपाक खोली याचबरोबर ग्राम पंचायत कार्यालयांचे काम प्राधान्यानुसार घेण्यात यावे.ओंबुडसमन वसुलीनुसार बाकी असणारी रक्कम त्वरित वसूल करावी व जिल्हा पंचायतीला अहवाल देण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली.रायबाग तालुक्यातील दोन ग्राम पंचायती व चिकोडी तालुक्यातील एक ग्राम पंचायतीने ग्रामसभा घेऊन त्वरित अहवाल द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली. एनआरएलएमअंतर्गत जीवनोपाय उपक्रमांसाठी महिला स्वयंसंघांना माहिती देण्यात यावी. स्वच्छ भारत योजनेंतर्गत प्रत्येक ग्राम पंचायतींकडून सदर काम प्रगतिपथावर रहावे. वैयक्तिक शौचालयांच्या उभारणीच्या कामामध्ये प्रगती साधण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली. जिल्हा पंचायत व्याप्तीमध्ये येणाऱ्या सर्व अधिकारी व कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या 5 तारखेला व्हावे. याची कार्यवाही करण्यात यावी, असे सांगितले. यावेळी जिल्हा पंचायत उपसंचालक बसवराज हेग्गनायक, विकास विभागाचे उपकार्यदर्शी बसवराज अडवीमठ, योजना विभागाचे संचालक रवी बंगारप्पण्णवर, मुख्यलेखाधिकारी परशराम दुडगुंटी, योजना अधिकारी गंगाधर दिवटर यांच्यासह तालुका पंचायत अधिकारी,ग्रामीण उद्योग आणि पंचायतराज खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.