छत्रपती शिवाजी उद्यानात स्वच्छता - सुरक्षा ठेवा
वीर मदकरी संघाचे मनपा आयुक्तांना निवेदन
बेळगाव : शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात दररोज मोठ्या संख्येने नागरिक फिरण्यासाठी येत असतात. मात्र उद्यानात येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबरोबरच स्वच्छताही नाही. त्यामुळे सदर समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशा मागणीचे निवेदन वीर मदकरी संघाच्या वतीने मनपा आयुक्त कार्तिक एम. यांना देण्यात आले. बुधवार दि. 6 रोजी वीर मदकरी संघाचे राज्याध्यक्ष आनंद शिरुर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून निवेदन सादर केले. दररोज सकाळी आणि संध्याकाळी नागरिक उद्यानात येऊन बसतात. त्याठिकाणी फिरण्यासह आबालवृद्ध खानपान करतात. इतकेच नव्हे तर काहीजण धूम्रपानही करत आहेत. परिणामी लहान मुले व महिलांना फिरायला बाहेर पडण्यास समस्या निर्माण होत आहे. शिवाय उद्यानात भटक्या कुत्र्यांच्या कळपाचा वावर आहे. याचा फिरण्यासह खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
उद्यानात सीसीटीव्ही बसवावेत
यासाठी उद्यानात धूम्रपान बंदी आणि दंडासंबंधी फलक लावावेत, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी, उद्यानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, प्रखर विद्युत रोषणाईची व्यवस्था करावी, लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सायंकाळी पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी करण्यात आली. निवेदनाचा स्वीकार करून आयुक्तांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी वीर मदकरी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.