For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Wai News | शाळा, कॉलेज आणि एसटी बसचा मुख्य मार्ग खड्ड्यात! वाईतील बेवारस रस्त्याने नागरिक त्रस्त

02:50 PM Aug 25, 2026 IST | NEETA POTDAR
wai news   शाळा  कॉलेज आणि एसटी बसचा मुख्य मार्ग खड्ड्यात  वाईतील बेवारस रस्त्याने नागरिक त्रस्त
Advertisement

वाई: वाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बसस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावरील महाराणा प्रताप चौक परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाली असून हा रस्ता 'बेवारस' असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. महाराणा प्रताप चौकातच गुडघाभर खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचल्याने या खड्यांची खोलीच लक्षात येत नाही. त्यामुळे बाहनचालक, विद्यार्थी, प्रवासी आणि पादचाऱ्यांचा जीव अक्षरशः मुठीत घेऊन प्रवास सुरू आहे.

Advertisement

या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत बाई नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता, 'हा रस्ता आमच्या अखत्यारित येत नाही,' असे सांगून दोन्ही विभागांनी हात वर केल्याचे समोर आले आहे. मग प्रश्न असा आहे की, हा रस्ता जर कुणाच्याच अखत्यारित नसेल तर त्याची देखभाल कोण करणार? नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारीनेमकी कुणाची?महाराणा प्रताप चौक परिसरातील हा मार्ग बाई शहरात ये-जा करणारा महत्वाचा रस्ता आहे. याच मार्गावर चर्च आणि सेंट थॉमस शाळा असून विद्यार्थी-विद्यार्थिनींची ये-जा असते. किसनवीर कॉलेजकडे जाणारे विद्यार्थीही याच रस्त्याचा वापर करतात. बस स्थानकावर विविध भागांतून येणारे प्रवासी याच मार्गाने शहरात प्रवेश करतात.विशेष म्हणजे मांढरदेव तसेच परिसरातील वाहतुकीसाठी एसटी महामंडळाच्या बसगाड्यांचीही या मार्गावर वर्दळ असते.

एका बाजूला शासनाकडून रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. दुसऱ्या बाजूला नागरिकांच्या जीवाशी संबंधित असलेले साधे खड्डे बुजवण्यासाठीही विभागांकडून 'हा रस्ता आमचा नाही' असा पवित्रा घेतला जात आहे. नागरिकांनी कर भरायचा, रस्त्यांचा वापर करायचा आणि खड्ड्यांतून जीव मुठीत धरून प्रवास करायचा; पण रस्त्याची जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली की संबंधित विभागांनी एकमेकांकडे बोट दाखवायचेही कसली रोकडा सवाल उपस्थित केला जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.