24 एप्रिल ते 2 मे पर्यंत पर्वरीतील मुख्य रस्ता बंद
मॅजेस्टिक हाटेल ते गौरी पेट्रोल पंपपर्यंतचा भाग
पणजी : सार्वजनिक बांधकाम विभाग पणजी, कार्य विभाग-7 (राष्ट्रीय महामार्ग) च्या कार्यकारी अभियंत्यांनी, सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामासाठी पर्वरी येथील राष्ट्रीय महामार्ग-66 चा एक भाग तात्पुरता बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. अधिसूचनेनुसार, विद्यमान राष्ट्रीय महामार्ग-66 ची उजवी बाजू 24 एप्रिल 2026 (मध्यरात्री) ते 20 मे 2026 पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील. मॅजेस्टिक हॉटेलजवळील ए 2 च्या बगल रस्त्यापासून गौरी पेट्रोल पंपाजवळील पी 86 पर्यंत रस्त्याची उजवी बाजू बंद असणार आहे. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि बांधकाम प्रक्रियेदरम्यान होणारा व्यत्यय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहनचालकांना सल्ला देण्यात येत आहे की, त्यांनी त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे आणि रस्ता बंद असताना निर्धारित पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे अधिकाऱ्यांनी कळविले आहे.