उचगाव महामार्ग चौकात मुख्य पाईपला गळती; रस्त्यावर पाणी साठल्याने वाहनधारकांची गैरसोय
उचगाव/ वार्ताहर
उचगाव ता.करवीर येथे महामार्ग चौकात पंचगंगा नदीतून एमआयडीसी ला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती लागल्याने उचगाव हायवे चौकात पाणी साठवून तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. सकाळी साडेसहा वाजल्यापासून हायवे चौकात कोल्हापूर हुपरी रस्त्याकडे जाताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती. पाणी कुठून येत आहे हे सुरुवातीस न समजल्याने काही वेळ वाहनधारकांच्या संभ्रम निर्माण झाला.
अखेर दुपारी दीड वाजण्याची सुमारास कामगार विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाईपला झालेली लिकेज गॅस वेल्डिंग ने काढल्यानंतर रस्त्यावर येणारे पाणी बंद झाले.
उचगाव महामार्ग चौकात कोल्हापूर रस्त्याच्या लगत कागल कडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर एमआयडीसी ला खर्चाच्या पाण्याचा पुरवठा होतो. सकाळी साडेसातच्या दरम्यान या पाईपला हॉटेल सूर्यदिप जवळ मोठी गळती लागल्याने उचगाव हायवे पाण्याने भरला.यावेळी या रस्त्यावरून मोठी वाहतूक असते. शाळेला ये जा करणारे, नोकरीवर जाणारे तसेच कामगार वर्गाची मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून वर्दळ असते. वाहनधारकांना विशेषतः मोटरसायकल स्वारांना या पाण्यातून मार्ग काढताना मोठी गैरसोय झाली. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सकाळी दहाच्या सुमारास गळतीचे पाणी शेताकडे वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्य झाले नाही .दुपारी एक वाजेपर्यंत हा खेळ खंडोबा चालू होता. काही जण मार्ग बदलून जात होते.तर काही या पाण्यातूनच मार्ग काढून मार्गस्थ होत होते. शेवटी एमआयडीसी कामगार विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही गळती गॅस वेल्डिंग करून थांबवल्यानंतर रस्ता सुरळीत झाला. मात्र एकीकडे पाण्यासाठी भटकंती होत असताना दुसरी मात्र या गळतीने रस्त्यावर पाणीच पाणी वाया गेले. तसेच वाहनधारकांनाही मोठी गैरसोय झाली याची चर्चा दिवसभर परिसरात चालू होती.