हथरस प्रकरणी मुख्य आयोजकास अटक
देवप्रकाश मधुकर याला 14 दिवसांची कोठडी, दोषींना सोडणार नसल्याची प्रशासनाची ग्वाही
वृत्तसंस्था / नवी दिल्ली, हाथरस
गेल्या मंगळवारी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे साकार हरी बाबांच्या सत्संग कार्यक्रमात झालेल्या भीषण चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी या कार्यक्रमाचा मुख्य आयोजक देव प्रकाश मधुकर याला अटक केली आहे. त्याला शनिवारी पहाटे दिल्लीत अटक करण्यात आली. त्याला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी देण्यात आली असून उत्तर प्रदेश पोलिस त्याच्या पोलीस कोठडीसाठी नंतर मागणी करु शकतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मधुकर या या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. या प्रकरणाची चौकशी वेगाने होत असल्याचे दिसत आहे.
देव प्रकाश मधुकर हा निधी गोळा करणे आणि सत्संग कार्यक्रमांचे विविध स्थानांवर आयोजन करणे आदी कामे करीत होता. तो ज्युनिअर इंजिनिअर पदावर काम करत असल्याची माहिती हाथरसचे जिल्हा पोलिस प्रमुख निपुण अग्रवाल यांनी दिली. सत्संग कार्यक्रमाच्या स्थानी पोलिसांनी येऊ नये अशी व्यवस्था त्यानेच केली होती. साकार हरी बाबांचे इतर सेवादार त्याला सहाय्य करीत होते. अशा सहा सेवादारांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. हाथरस येथे झालेल्या सत्संग कार्यक्रमाला अनुमती देताना ज्या अटी घालण्यात आल्या होत्या, त्यांचे उल्लंघन मधुकर याच्याच सांगण्यावरुन झाल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.
सेवादारांची कर्तव्यच्युती
हाथरसच्या कार्यक्रमात जेव्हा भाविकांची पळापळी आणि चेंगराचेंगरी सुरु झाली, तेव्हा साकार हरी बाबांच्या सेवादारांनी भाविकांना सांभाळण्यासाठी कोणताही सेवादार पुढे आला नाही. तसेच अस्ताव्यस्त गर्दीला रोखण्याचा प्रयत्नही करण्यात आला नाही. सत्संग कार्यक्रम झाल्यानंतर साकार हरी बाबांची कार मुद्दाम गर्दीच्या मधून बाहेर काढण्यात आली. त्यामुळे लोकांची पळापळ झाली. त्यामुळे अनेक बेसावध भाविक खाली पडले आणि तुडविले गेले, अशी माहिती देण्यात आली.
सर्वात जवळचा सेवादार
मधुकर हा साकार हरी बाबांचा सर्वात जवळचा सहकारी आणि विश्वासू होता. तो बाबांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करत असतो. तसेच अशा कार्यक्रमांसाठी निधी संकलित करण्यातही त्याचा पुढाकार असतो. त्याला निधी पुरविणारे कोण आहेत, हे आता तपासले जात आहे. या घटनेला घातपात कारणीभूत आहे काय, याचीही सखोल चौकशी केली जात आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
दूरध्वनी संपर्क तपासणार
मधुकर याच्यासह अटक केलेल्या सर्व सेवादारांचे आणि इतर संशयितांचे दूरध्वनी संपर्क शोधले जात आहेत. त्यांनी कोणाकोणाला कॉल्स केले किंवा कोणाचे कॉल्स त्यांना आले आहेत, याची माहिती पोलिस शोधत आहेत. त्यांचे विदेशी शक्तींशी संबंध आहेत काय, याची चाचपणी करण्या येत आहे.
राजकीय लागेबांधे शोधणार
देव प्रकाश मधुकर आणि साकार हरी बाबा यांचे राजकीय लागेबांधे शोधण्याचा प्रयत्नही पोलिसांकडून केला जात आहे. उत्तर प्रदेश सरकारला बदनाम करण्यासाठी या घटनेचे कारस्थान करण्यात आले होते का, याचाही मागोवा घेतला जाणार आहे. बाबा राजकीय पक्षांकडूनही निधी घेतात, अशी गुप्त माहिती पोलिसांच्या हाती लागली असून त्या दृष्टीने तपास केला जात आहे. मिळालेला निधी कोणत्या प्रकारे खर्च केला जात होता, याचाही शोध घेण्यासाठी हालचाली होत आहेत.
निधीव्ययाचा मागोवा घेणार
साकार हरी बाबा यांचे मोठे आर्थिक व्यवहार आहेत. त्यांची मालमत्ता 100 कोटीहून अधिक असल्याचे तपासात आढळले आहे. बाबांच्या भक्तांचेही जाळे मोठे आहे. त्यांना पैसा कोठून मिळतो आणि तो कोठे खर्च केला जातो, सर्वसामान्य भक्तांची व्यवस्था कशी केली जाते आणि बाबांच्या आश्रमांमध्ये अवैध कृत्ये चालतात काय, याचीही चौकशी होणार आहे. सध्या पोलिसांनी त्यांचे लक्ष हाथरस दुर्घटनेवर केंद्रीत केले आहे. मधुकर याची पार्श्वभूमी शोधून काढली जात आहे. कोणतीही शक्यता न नाकारता चौकशी होत आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
पोलिसांच्या कारवाईला वेग
ड हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लावणार
ड दोषींवर कठोर कारवाई करण्याचे प्रशासनाकडून ठाम आश्वासन
ड घातपाताची शक्यताही तपासणार, राजकीय लागेबांधे शोधणार
ड सत्संग कार्यक्रमाला पैसा पुरविणाऱ्यांचीही कसून तपासणी होणार