Ichalkaranji Crime | हॉटेलमधील 'ते' जबरदस्तीचे काम अन् बंद दाराआडचा तो भयानक छळ; इचलकरंजीतील 'त्या' पीडित महिलेच्या तक्रारीतील अंगावर काटा आणणारे खुलासे!
इचलकरंजी : हातउसने घेतलेल्यापैशांच्या व्याजासाठी तगादा लावत एका महिलेला जबरदस्तीने वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार सर्जेराव साताप्पा कुंभार (रा. रामनगर, भोनेमाळ) याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत चार जणांना अटक केली असून तिघे न्यायालयीन कोठडीत आहेत. पीडित महिलेच्या पतीचा अपघात झाल्यानंतर तिने संशयित उज्वला दोरुगडे हिच्याकडून सात हजार रुपये हातउसने घेतले होते. संबंधित रक्कम मुदतीत परत करूनही उज्वला हिने व्याजाच्या नावाखाली महिलेकडे सतत तगादा लावला. त्यानंतर कुंभार याच्या हॉटेलमध्ये तिला जबरदस्तीने कामाला ठेवण्यात आले.
दरम्यान, व्याजाची रक्कम मिळतनसल्याचे कारण पुढे करत उज्वला दोरुगडेने पीडितेला आपल्या घरी बोलावले. तेथे तिला परपुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. तसेच विनायक पवार याच्याशी ओळख करून देत तो आणेल त्या ग्राहकांशी संबंध ठेवण्यास सांगितल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकाराला कंटाळून पीडित महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार उज्वला दोरुगडे, युनूस गवंडी आणि विनायक पोबार (रा. सहारानगर, रुई) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. मुख्य संशयित सर्जेराव कुंभार हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांच्या पथकाने कर्नाटकात शोधमोहीम राबवून त्याला ताब्यात घेत अटक केली.