महुआ मोईत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द! आचार समितीचा अहवाल स्वीकारल्यानंतर सरकारचा निर्णय
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे सदस्यत्व लोकसभा सभागृहाने रद्द करून त्यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर केला. संसदेतील अनाधिकृत व्यक्तीला संसदेच्या सदस्यांचे लॉगिन आणि पासवर्ड दिल्याबद्दल, त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षेबद्दल बेजबाबदारपणा, अनैतिक आचरण तसेच सदनाचा अवमान केल्याचा आरोप ठेऊन महुआ मोईत्रा यांना निष्कासित करण्यात आले. यासंबंधीची शिफारस करणार्या आचार समितीचा अहवाल स्वीकारल्यानंतर सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला.
उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून संसदेत प्रश्न मांडण्यासाठी महूओ मोईत्रा यांनी लाच घेतल्याचा आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला होता. खासदार दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून मोईत्रा यांच्यावर लाचखोरी आणि अयोग्यतेचा आरोप करून आचार समितीकडून चौकशी करण्याची मागणी केली.
त्यानंतर चौकशी समितीसमोर उद्योगपती हिरानंदानी यांनी आपल्या स्वाक्षरी केलेल्या प्रतिज्ञापत्रात मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "अपमानित" करण्याच्या हेतूने गौतम अदानी यांच्यावर आरोप केल्याचे म्हटले आहे.
लोकसभेच्या आचार समितीने 6- 4 बहुमताने अहवाल स्वीकारला. या अहवालामध्ये खासदार मोईत्रा यांनी आपले लॉगिन क्रेडेन्शियल्स आणि पासवर्ड संसदेबाहेरील एका अनधिकृत व्यक्तीला देऊन राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याचा ठपका ठेवला.
तसेच मोईत्रा यांनी हिरानंदानी यांच्याकडून “रोख पैसे आणि इतर विविध सुविधा” स्वीकारून संसदेत प्रश्न विचारले. ल्या 61 पैकी 50 प्रश्न हिरानंदानी यांच्या व्यावसायिक हितसंबंधांचे रक्षण किंवा प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने होते, असा आरोपही त्यात करण्यात आला आहे.
समितीचे आरोप मोईत्रा यांनी लाचखोरीचे आरोप निराधार असल्याचे फेटाळून लावले. मोइत्रा यांनी आरोप केला की लोकसभेच्या आचार समितीच्या सुनावणीदरम्यान तिला अपमानास्पद प्रश्नांना सामोरे जावे लागले. तसेच त्यांनी समितीच्या अध्यक्षांवर कारवाईशी संबंधित नसलेली "घृणास्पद आणि खाजगी तपशील" असलेली स्क्रिप्ट वाचल्याचा आरोप केला.