महित संधूला नेमबाजीत सुवर्णपदक
वृत्तसंस्था / टोकियो
येथे सुरू असलेल्या उन्हाळी डेफ ऑलिम्पिक्स स्पर्धेत भारताची महिला नेमबाज महित संधूने नेमबाजी या क्रीडा प्रकारात शनिवारी सुवर्णपदक पटकाविले. तिने महिलांच्या 50 मी. रायफल थ्री पोझीशन प्रकारात हे सुवर्णपदक मिळविले. या स्पर्धेतील महितचे हे चौथे पदक आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय नेमबाजांची कामगिरी पूर्वीच्या तुलनेत निश्चितच दर्जेदार झाली असून आतापर्यंत त्यांनी 5 सुवर्ण, 6 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण 14 पदकांची कमाई केली आहे.
महिलांच्या 50 मी. रायफल थ्री पोझीशन नेमबाजी प्रकारात महित संधूने 456.0 शॉट्स नोंदवित सुवर्णपदकाला गसवणी घातली. या क्रीडा प्रकारात द. कोरियाच्या डेन जेआँगने 453.5 शॉट्स नोंदवित रौप्य पदक तर हंगेरीच्या मिरा बायटोव्हेस्कीने 438.6 शॉट्स नोंदवित कांस्यपदक मिळविले. महितचे या स्पर्धेतील हे दुसरे सुवर्णपदक आहे., महितने या कामगिरीबरोबरच डेफ पात्र फेरी स्पर्धेत तसेच डेफ ऑलिम्पिक स्पर्धेत नवे विश्व्ाविक्रम नोंदवित अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. भारताचे अभिनव जैस्वाल आणि चेतन सपकाळ हे आता 25 मी. पिस्तुल नेमबाजी प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.