महिंद्राच्या वाहन विक्रीत 23 टक्के वृद्धी
नवी दिल्ली :
मंगळवारच्या शेअर बाजाराच्या सत्रात मोठ्या प्रमाणामध्ये पडझड सुरू असतानाच महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे समभाग मात्र दमदार तेजी दाखवत व्यवहार करत होते. कंपनीने मार्च 2025 मध्ये वाहन विक्रीमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे त्याचे सकारात्मक परिणाम शेअर बाजारात समभागावर दिसून आले.
कंपनीचा समभाग मंगळवारी इंट्राडे दरम्यान 3 टक्के इतका वाढत 2728 रुपयांच्या स्तरावर पोहोचला होता. शुक्रवारी समभाग 2665 रुपयांवर बंद झाला होता. 2025 च्या मार्च महिन्यात महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीची सर्व प्रकारातील वाहन विक्री 23 टक्क्यांनी वाढीव दिसून आली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 83 हजार 894 वाहनांची विक्री मार्च महिन्यात करण्यात आली आहे. एक वर्षामागे याच महिन्यामध्ये 68 हजार 413 वाहनांची विक्री केली गेली होती.
एसयुव्ही वाहन, ट्रॅक्टर विक्री तेजीत
वाहन प्रकारामध्ये पाहता एसयुव्ही गटातील कार्सनी विक्रीमध्ये चांगली प्रगती दर्शवली आहे. मार्च महिन्यात 48 हजार 48 एसयुव्ही गटातील कार्स विकल्या गेल्या आहेत. वर्षाच्या आधारावर पाहता विक्री 18 टक्के वाढीव दिसली आहे. एवढंच नाही तर ट्रॅक्टरच्या विक्रीतही महिंद्राने चमकदार कामगिरी केली आहे. मार्च महिन्यात 34 हजार 934 ट्रॅक्टरची विक्री झाली असून वर्षाच्या आधारावर पाहता विक्री 34 टक्के वाढली आहे. मागच्या वर्षी मार्च महिन्यात 26 हजार 24 ट्रॅक्टरची विक्री झाली होती.
समभागाची एकंदर कामगिरी
विक्री वाढीची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर कंपनीचे समभाग शेअर बाजारामध्ये तेजीसह कार्यरत होताना दिसले. 3 टक्के इतके समभाग मंगळवारी चढले. गेल्या तीन महिन्यांमध्ये कंपनीचा समभाग 13 टक्के इतका घसरला असून एक आठवड्यात पाहता 3 टक्के इतकी घसरण दिसून आली आहे. मात्र एक महिन्याची कंपनीच्या समभागाची कामगिरी पाहता समभाग 2 टक्के इतका वाढला आहे. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे एकूण बाजार भांडवल मूल्य मंगळवारी 3 लाख 28 हजार 471 कोटी रुपयांवर पोहोचले होते.