महिंद्रा अॅण्ड महिंद्राची घाऊक विक्री 21 टक्क्यांनी वधारली
नवी दिल्ली
: महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची नोव्हेंबरमध्ये एकूण घाऊक विक्री वार्षिक 21 टक्क्यांनी वाढून 70,576 युनिट्स इतकी झाली आहे. कंपनीने नोव्हेंबर 2022 मध्ये 58,303 युनिट्सचा पुरवठा केला होता. महिंद्रा अॅण्ड महिंद्राने सादर केलेल्या निवेदनानुसार, मोटार वाहन निर्मात्यांनी गेल्या महिन्यात युटिलिटी वाहनांच्या 39,981 युनिट्सचा पुरवठा केला. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने 30,238 युनिट्सचा पुरवठा केला होता तेव्हाच्या तुलनेत हे प्रमाण 32 टक्क्यांनी जास्त आहे.
तथापि, नोव्हेंबर 2022 मधील 3,122 युनिट्सच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये निर्यात 42 टक्क्यांनी घसरून 1,816 युनिट्सवर आली. विजय नाकरा, अध्यक्ष, ऑटोमोबाईल सेगमेंट, ‘एसयूव्ही सेगमेंट मजबूत मागणीनुसार वाढतच आहे. सणांचा हंगाम चांगला असला तरी, या महिन्यात निवडक विभागांमध्ये पुरवठ्याच्या आव्हानांचा सामना करावा लागला. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी योग्य पावले उचलत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.