महिंद्राने केली एसयुव्ही कार्सच्या किमतीत कपात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील आघाडीवरची ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा यांनी आपल्या स्पोर्टस युटिलिटी व्हेईकलवरच्या अर्थात एसयुव्हीच्या किमती नुकत्याच कमी केल्या आहेत. एसयूव्ही गटातील विक्री वाढवण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे.
किमतीमध्ये फारशी काही कपात करण्यात आलेली नाही, असेही म्हटले जात आहे. या किमती कमी करण्यात आल्यानंतर कंपनीच्या समभागावर शेअर बाजारामध्ये परिणाम दिसून आला होता. महिंद्रा आणि महिंद्राचा समभाग त्यादिवशी शेअर बाजारात 7 टक्केपर्यंत घसरणीत राहिला होता. कंपनीच्या बाजार भांडवलमूल्यामध्ये घसरण दिसून आली. बाजार भांडवल मूल्य 24087 कोटी रुपयांनी घसरून 3 लाख 39 हजार 744 कोटी रुपयांवर राहिले होते.
एक्सयूव्ही-700 ही कंपनीची गाडी आता दोन लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत आता 19.49 लाख रुपये असणार आहे.
टाटाने घटवल्या किमती
यासोबत टाटा मोटर्स या कंपनीनेसुद्धा एसयुव्ही गटातील आपल्या कारच्या किमती कमी केल्या आहेत. एसयूव्ही हॅरियर आणि सफारी यांच्या किमती यापुढे अनुक्रमे 14.99 लाख 15.49 लाख रुपये असणार आहेत. लोकप्रिय एसयुव्ही मॉडलवर कंपनीने जवळपास 1 लाख 30 हजार रुपयांची कपात केली आहे. इलेक्ट्रिक वाहन नेक्सॉनच्या किंमतीतही जवळपास 1 लाख 30 हजाराची कपात केली आहे. पंच ईव्हीच्या किंमतीतही 39 हजार रुपयांची कपात करण्यात आलीय.