दिल्लीत पुन्हा महिलाराज ; आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा रंगली होती. आता या चर्चांवर पूर्णविराम लागला असून आतिशी या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत. अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी (AAP) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. याला पक्षातील आमदारांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील.
दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री
आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील. यापूर्वी सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित या दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री राहिल्या आहेत. त्यानंतर आता आतिशी यांना हा मान मिळणार आहे.याआधी आम आदमी पक्षाच्या पॉलिटीकल अफेअर्स कमिटीच्या (पीएसी) नेत्यांनी दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांचं नाव सुचवले होते. सोमवारी (१६ सप्टेंबर) पीएसीची बैठक झाली होती या बैठकीत आतिशी यांचं नाव सुचवलं होतं.
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
अरविंद केजरीवाल यांनी रविवारी (१५ सप्टेंबर) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. ते आज (मंगळवार १७ सप्टेंबर) संध्याकाळी उप-राज्यपाल विनय सक्सेना यांची भेट घेऊन आपला राजीनामा सादर करतील.