‘महिला आयोग आपल्या दारी’तून पिडितांना सुरक्षेचा विश्वास
रूपाली चाकणकर
जनसुनावनीत 26 प्रकरणांचा निपटारा
156 प्रकरणांची सुनावणी
कोल्हापूर
गेल्या अनेक वर्षापासून विविध प्रकरणातील पिडित न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. प्र्रत्येक तक्रारदार महिला, व्यक्ती न्यायासाठी मुंबईतील राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात येवू शकत नाही. यासाठी शासनाने महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. यातून पिडितांना सुरक्षेचा विश्वास निर्माण होत असुन जलद न्याय मिळत असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.
‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत शुव्र्रवारी आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित प्रकरणासंदर्भात जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. या जनसुनावणीत जिल्ह्यातील 26 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तर 156 प्रकरणांची सुनावणी झाली. महिलांना जलद न्याय मिळण्यासाठी महिला आयोग त्यांच्या दारी येत असुन महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनें कठोर कायदे केले जाणार असुन आगामी काळात महिलांवर आत्याचार करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
चाकणकर म्हणाल्या, शाहू महाराजांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आयोग काम करीत आहे. समाजातील विधवा प्रथा, गर्भलिंग हत्या, हुंडाबळी अशा अनिष्ट गोष्टी थांबवण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील आहे. महिलांना जलद न्याय मिळावा व त्यांचे मानसिक आधार मिळावा, यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जात आहे. राज्यात झालेल्या सुनावण्यांच्या तुलनेत कोल्हापुरात सर्वाधिक प्रकरणे निपटारा झाली आहेत.
महिलांचे प्रश्न, तक्रारी, अडचणी सोडवण्यासाठी महिला आयोग कटिबध्द आहे. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी चार पॅनेल तयार करण्यात आले आहेत. या उपक्रमात शेवटच्या तक्रारदाराची तक्रार ऐकून घेवून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करा. आवश्यक ती कार्यवाही करा, कोणत्याही अधिकाऱ्यांनी हयगय केल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शुक्रवारी झालेल्या जन सुनावणीत 156 प्रकरणे प्राप्त झाली. यामधील सर्वात जास्त 115 केसेस वैवाहिक कौटुंबिक विषयाशी संबंधित होत्या. सामाजिक - 19, मालमत्ता, आर्थिक समस्येशी संबंधित- 15 व इतर विषयाशी संबंधित 7 केसेस अशा एकूण 156 केसेस दाखल झाल्या. यातील 26 तक्रारी जनसुनावणीत सामोपचाराने मिटवण्यात यश आले. समेट झालेल्या प्रकणतील नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, आयोगाचे जिल्हा समन्वयक आनंद शिंदे आदी उपस्थित होते.