महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महायुतीला गतवैभव, लाल दिव्यासाठी चढाओढ

11:46 AM Nov 25, 2024 IST | Pooja Marathe
Mahayuti's past glory, fight for red light
Advertisement

जिल्ह्यात महायुतीला निर्विवाद यश:

Advertisement

मुश्रीफ, कोरे, आबिटकर, महाडिक, क्षीरसागर, नरके, यड्रावकर मंत्रीपदाच्या रेसमध्ये

Advertisement

शिवसैनिकांना मंत्रिपदाच्या स्वप्नपूर्तीची प्रतीक्षा

कोल्हापूर /धीरज बरगे

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीला पुन्हा गतवैभव मिळाले. दहा पैकी दहा जागांवर महायुतीला यश मिळाल्याने आता नूतन आमदारांमध्ये लाल दिव्यासाठी चढाओढ निर्माण झाली आहे. जिल्ह्यातून आमदार हसन मुश्रीफ, विनय कोरे, अमल महाडिक, प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील-यड्रावकर हे मंत्रिपदाच्या रेसमध्ये असणार आहेत. तर आतापर्यंत शिवसेनेला जिल्ह्यात एकदाही मंत्रीपद न मिळाल्याने शिवसैनिकांना मंत्रिपदाच्या स्वप्नपूर्तीची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यावर 1972 पासून 2004 पर्यंत शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. 1990 च्या निवडणुकीत  शाहूवाडी मतदार संघातून स्व. बाबासाहेब पाटील आणि कोल्हापूर शहरातून स्व. दिलीप देसाई यांच्या विजयातून शिवसेनेने जिल्ह्यात प्रवेश केला. मात्र यानंतर 2004 पर्यंत केवळ एका जागेवरच शिवसेनेला विजय मिळवता आला. 1995 आणि 1999 मध्ये शहरातून सुरेश साळोखे तर 2004 मध्ये शाहूवाडीतून सत्यजित पाटील आमदार झाले. 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही जिल्ह्यात प्रवेश केला. इचलकरंजी मतदारसंघातून भाजपचे सुरेश हाळवणकर विजयी झाले. तर चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर आणि डॉ. सुजित मिणचेकर हे तीन उमेदवार प्रथमच शिवसेनेकडून निवडणूक लढत विजयी झाले. या निवडणुकीत शिवसेना भाजपच्या आमदारांची संख्या चार झाली.
त्यानंतर 2014 निवडणुकीतही शिवसेना-भाजपला नेत्रदीपक यश मिळाले. जिल्ह्यातील दहा पैकी आठ जागांवर उमेदवार विजयी झाले. यामध्ये शिवसेनेची संख्या तीनवरुन सहा तर भाजपची संख्या एकवरुन दोन झाली. 2019 च्या निवडणुकीत मात्र शिवसेना-भाजप युतीची पूर्णता पिछेहाट झाली. जिल्हयातून प्रकाश आबिटकर हे एकमेव आमदार निवडून आले. या निवडणुकीत शिवसेनेने भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात पकडत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता अस्तित्त्वात आणली. यानंतर राज्यातील राजकीय समिकरणे पूर्णत: बदलून गेली. हे सरकार अडीच वर्षच चालले. शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राज्याची राजकीय समीकरणे आणखीनच बदलून गेली. पक्ष फोडाफोडी, बंडखोरीमुळे इर्ष्येच्या बनलेल्या या राजकारणात शिंदे, फडणवीस, पवार यांच्या महायुतीने 2024 च्या विधानसभेत एकहाती यश मिळविले. कोल्हापूर जिल्ह्यातही महायुतीने महाविकासला  धोबीपछाड केले. या निवडणुकीतही शिवसेना, भाजपला गतवैभव मिळाल्याने निवडून आलेल्या आमदारांमध्ये आता मंत्रीपदासाठी चढाओढ निर्माण झाली आहे.

दहापैकी सात आमदार मंत्रीपदाच्या रेसमध्ये
जिल्ह्यात महायुतीचे दहा आमदार निवडून आले असले तरी दहापैकी सात आमदार मंत्रीपदाच्या रेसमध्ये असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्ह्यातून एकमेव आमदार असलेले आणि सहाव्यांदा निवडून आलेले हसन मुश्रीफ यांचे मंत्रीपद जवळपास निश्चितच आहे. तर भाजपच्या कोट्यातून जनसुराज्यचे आमदार  विनय कोरे आणि आमदार अमल महाडिक हे रेसमध्ये असणार आहेत. तर शिवसेनेतून विजयाची हॅट्ट्रीक केलेले आमदार प्रकाश आबिटकर हे मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले आणि तिसऱ्यांदा आमदार झालेले राजेश क्षीरसागर यांच्यासह चंद्रदीप नरकेही मंत्री पदाच्या रेसमध्ये आहेत. तर शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडूनही मंत्री पदासाठी दावा केला जात आहे.
 

शिवसैनिकांची मंत्रीपदाची स्वप्नपूर्ती होणार
कोल्हापूर शहर शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. तर 2009 पासून जिल्ह्यात शिवसेनेच्या आमदारांची संख्या वाढली. 2014 च्या निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले. मात्र जिल्ह्यातील भाजप-शिवसेनेमध्ये असलेल्या अंतर्गत हेवेदावे यामुळे सहा आमदार असूनही मंत्रीपद मिळाले नाही. 2019 च्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात आबिटकर हे एकमेव शिवसेनेच आमदार होते. पण त्यांना मंत्रीपद न देता शिवसेनेच्या कोट्यातून शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मंत्रीपद मिळाले. तसेच 2022 मध्येही अस्तित्त्वात आलेल्या महायुतीच्या सरकार काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिलेले आबिटकर यांना मंत्री पदापासून दूर ठेवण्यात आले. त्यामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात शिवसेनेला एकदाही मंत्रीपद मिळालेले नाही. 2024 च्या निवडणुकीत शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले आहेत, त्यामुळे शिवसैनिकांना मंत्रीपदाच्या स्वप्नपूर्तीची अपेक्षा आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्द पाळणार
राधानगरी-भूदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारानिमित्त झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आबिटकर यांना मंत्री करण्याचा शब्द येथील जनतेला दिला होता. मुख्यमंत्री शिंदे हे दिलेला शब्द पूर्ण करतात अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे आमदार आबिटकर यांना मंत्री करण्याचा शब्द मुख्यमंत्री पाळणार का याकडे संपूर्ण राधानगरी-भूदरगड मतदार संघाचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर हे देखिल मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आहेत. उत्तरची जागा भाजपकडे घेण्याबाबत दबाव असूनही मुख्यमंत्री शिंदे उत्तरची जागा शिवसेनेकडेच ठेवण्यासाठी ठाम राहिले. उत्तरमधून क्षीरसागर विजयी झाल्याने आबिटकर यांच्यासोबत क्षीरसागरही मंत्रीपदाच्या रेसमध्ये असणार आहेत.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article