Kolhapur Breaking : कोल्हापूर महापालिकेवर अखेर महायुतीचा झेंडा; महापौरपदी रूपाराणी निकम, उपमहापौरपदी अक्षय जरग
कोल्हापूर महापालिकेत प्रथमच महायुतीची सत्ता
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी संग्रामसिंह निकम यांची, तर उपमहापौरपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांची शुक्रवारी बहुमताने निवड झाली. या निवडीमुळे कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच महायुतीचा झेंडा महापालिकेवर फडकला आहे.
महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीनंतर महायुतीच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. महापालिका परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत रूपाराणी निकम यांना ४६ मते, तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे नगरसेवक सचिन मारुती शेंडे यांना ३५ मते मिळाली. बहुमताच्या आधारे रूपाराणी निकम यांची महापौरपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.