For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धैर्यशील मानेंनी राखला हातकणंगलेचा गड; 14 हजार 723 मतांनी मानें विजयी

09:36 PM Jun 04, 2024 IST | Abhijeet Khandekar
धैर्यशील मानेंनी राखला हातकणंगलेचा गड  14 हजार 723 मतांनी मानें विजयी
Mahayuti MP Darhysheel Mane
Advertisement

मतमोजणीच्या शेवटच्या फेरीअखेर उत्कंठा शिगेला; मानेंनी 15 व्या फेरीनंतर घेतली निर्णायक आघाडी; महाविकास आघाडीचे सत्यजीत पाटील यांचा निसटता पराभव

कोल्हापूर प्रतिनिधी

हातकणंगले मतदारसंघात शेवटच्या फेरीपर्यंत उत्कंठा ताणलेल्या निकालाचा कौल अखेर विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या बाजूने लागला. महायुतीचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांना 14 हजार 723 मतांनी पराभव पत्करावा लागला. स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना लोकसभेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्या पराभावाचा सामना करावा लागला. शेट्टी यांना 1 लाख 44 हजार मतांवर समाधान मानावे लागले. कोल्हापुरातील दोन्ही जागांवर एक-एक असा सामना जिंकत महायुती आणि महाविकास आघाडीने बरोबरी साधली.

Advertisement

लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात एकूण 71.59 टक्के तर हातकणंगले मतदारसंघात 71.11 टक्के मतदान झाले होते. ‘कोल्हापूर‘मध्ये 23 आणि ‘हातकणंगले‘मध्ये 27 उमेदवार रिंगणात होते. मात्र खरी लढत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती आणि महायुतीचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यात झाली. तर हातकणंगलेमध्ये महायुतीचे खासदार धैर्यशील माने, महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील-सरुडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि वंचित आघाडीचे डी.सी. पाटील यांच्यात चौरंगी लढत झाली. दोन्ही मतदारसंघात एकूण 37 लाख 50 हजार 680 मतदार आहेत. त्यापैकी ‘कोल्हापूर‘ मध्ये 19 लाख 36 हजार 430 पैकी 13 लाख 86 हजार 230 मतदारांनी हक्क बजावला. तर ‘हातकणंगले‘तील एकूण 18 लाख 14 हजार 277 मतदार आहेत. यापैकी 12 लाख 90 हजार 73 मतदारांनी मतदान केले होते. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. कोल्हापूरची मतमोजणी कसबा बावडा, रमणमळा येथील धान्य गोदाम येथे तर हातकणंगलेची मतमोजणी राजाराम तलाव येथील बहुउद्देशीय हॉल येथे झाली.

हातकणंगलेत धैर्यशील मानेंना लॉटरी
हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये बहुरंगी लढतीचे चित्र असले तरी महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजीत पाटील यांच्यामध्ये प्रमुख तिरंगी सामना झाला. यामध्ये मतदारसंघातील जनमताचा कौल पाहता सत्यजीत पाटील यांना मताधिक्य मिळेल असा अंदाज अनेक एक्झिट पोलनी वर्तवला होता. त्यानुसार मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून मताधिक्य मिळवत 14 व्या फेरीपर्यंत सत्यजीत पाटील 4 हजार 617 मतांनी आघाडीवर होते. पण 15 व्या फेरीनंतर त्यांच्या मताधिक्यामध्ये घट होऊन धैर्यशील माने यांनी 1270 मतांनी आघाडी घेतली. या मताधिक्यामध्ये पुढील सर्व फेऱ्यांमध्ये वाढच होत राहिली. त्यानुसार 16 व्या फेरीमध्ये त्यांनी 7 हजार 351, 17 व्या फेरीत 9 हजार 465, 18 व्या फेरीत मताधिक्यामध्ये थोडी घट होऊन ते 12 हजार 118 पर्यंत खाली घसरले. पुन्हा 19 व्या फेरीत 12 हजार 681 इतके झाले. त्यानंतर 20 व्या फेरीत 15 हजार 193 मताधिक्य घेतले. त्यानंतर 21 व्या फेरीत माने यांच्या आघाडीत पुन्हा 1 हजार 669 मतांनी घट झाली. 22 व्या फेरीतही त्यांच्या आघाडीला ब्रेक लागू 445 मतांनी घटले. पुन्हा 23 व्या फेरीत आघाडी घेत त्यांनी 13 हजार 997 मतांनी आघाडी घेतली. तर अखरेच्या 24 व्या फेरीत देखील त्यांनी 726 मताधिक्य मिळवत एकूण 14 हजार 723 मतांनी विजय संपादन केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.