महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महायुती,मविआच्या उमेदवारांना बंडखोरांची धास्ती

05:15 PM Oct 30, 2024 IST | Radhika Patil
Mahayuti, MAVIA candidates fear rebels
Advertisement

कृष्णात चौगले / कोल्हापूर

Advertisement

विधानसभा निवडणुकीसाठी जिह्यातील दहा मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह अनेक बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज माघार घेण्यासाठी 4 नोव्हेंबर पर्यंत मुदत आहे. या कालावधीत बंडखोरांना शांत करण्याचे महायुती आणि ‘मविआ’चे नेते आणि उमेदवारांसमोर आव्हान आहे. ज्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच असा निर्धार केल्यामुळे पक्षीय उमेदवारांना घाम सुटला आहे. स्वकियांनीच हाती बंडाचे निशाण घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात मत विभागाणी होणार असून निवडणूक रिंगणातील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे गणित चुकणार आहे.

Advertisement

चंदगड विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) गटाकडून आमदार राजेश पाटील तर ‘मविआ’कडून शरद पवार राष्ट्रवादीच्या नंदाताई बाभूळकर यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे ही निवडणूक काही अंशी पवार विरुद्ध पवार अशीच होणार आहे. पण लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसोबत राहून खासदार श्रीमंत शाहू छत्रपतींच्या प्रचारात सक्रिय सहभागी असणारे जिल्हा बँकेचे माजी संचालक आप्पी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ‘मविआ’च्या उमेदवार बाभुळकर यांना मिळणाऱ्या मतांमध्ये विभागणी होणार आहे. चंदगडमधील भाजपचे नेते शिवाजीराव पाटील यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक लढवायची आणि जिंकायची असा चंग त्यांनी बांधला आहे. तसेच उद्योगपती मानसिंगराव खोराटे यांनीही जनसुराज्य शक्ती पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे. वास्तविक जनसुराज्य हा महायुतीचा घटक पक्ष आहे. तरीही त्यांनी निवडणूकीच्या आखाड्यात उतरण्याची पूर्णपणे तयारी केली आहे. त्यामुळे या दोन उमेदवारांमुळे आमदार राजेश पाटील यांच्या बेरजेचे गणित चुकण्याची शक्यता आहे.

राधानगरीत ‘मविआ’मध्ये बंडखोरी

राधानगरी मतदारसंघातून ‘मविआ’कडून उबाठा शिवसेनेकडून माजी आमदार के.पी.पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी अर्ज दाखल केला असून हॅटट्रिक साधण्यासाठी देव पाण्यात घातले आहेत. त्यांना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी जाहीर पाठींबा दिला आहे. पण जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय.पाटील यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली नसल्यामुळे त्यांनी बंडखोरीचा पर्याय निवडला असून ‘लढणार आणि जिंकणारच’ असा दृढ निश्चय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे के.पी.पाटील यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या गटाचे बहुतांशी मतदान हे आमदार प्रकाश आबिटकर यांना झाले होते. पण या निवडणुकीत काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी राधानगरीतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन के.पी.पाटील यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आमदार आबिटकर यांच्यासमोर काँग्रेसच्या कमी होणाऱ्या या मतांची गोळाबेरीज करण्याचे आव्हान आहे.

कागलमध्ये अॅड. विरेंद्र मंडलिक यांची मनधरणी

कागल विधानसभा मतदारसंघात मात्र महायुतीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि ‘मविआ’कडून शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांच्यातच एकास एक अशी चुरशीची लढत होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातील मतदानाची थेट दोन उमेदवारांत विभागणी होणार आहे. माजी खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव अॅड विरेंद्र मंडलिक यांनी आपल्या गटाचा मेळावा घेऊन निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. पण त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. कदाचित त्यांना भविष्यात राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द मिळाला असल्यामुळे कागलमधील बंड शांत झाले आहे.

करवीरमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला वेग

चंदगड प्रमाणेच करवीर विधानसभा मतदारसंघातून महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाने संताजी घोरपडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटातून माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सद्यस्थितीत शिंदे गटाचे चंद्रदीप नरके आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार विनय कोरे हे महायुतीचे घटक असले तरी ते पारंपरीक विरोधक आहेत. त्यामुळे आजतागायत करवीर मतदारसंघातील पश्चिम पन्हाळा आणि गगनबावडामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नरके विरुद्ध कोरे अशीच लढत झाल्याचे चित्र आहे. त्यामुळेच गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये कोरे गटाची मदत ही दिवंगत आमदार पी.एन.पाटील यांना झाली होती. त्यामुळे घोरपडे यांच्या उमेदवारीमुळे नरके यांच्या मिळणाऱ्या मतांमध्ये कोणताही फरक पडणार नाही असे त्यांच्या कार्यकर्त्यांचे मत आहे. या मतदारसंघातून ‘मविआ’कडून राहूल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सध्या या मतदारसंघात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे.

हातकणंगले, शिरोळमध्ये तिसऱ्या आघाडीचा सक्षम पर्याय

हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून पुर्वाश्रमीचे उबाठा गटाचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी हातकणंगलेतून आणि माजी आमदार उल्हास पाटील यांनी शिरोळ मतदारसंघातून तिसऱ्या आघाडीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या दोन्ही माजी आमदारांची त्यांच्या मतदारसंघात आजही लक्षणीय ताकद असल्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीला आता या दोघांचा सामना करावा लागणार आहे. तसेच भविष्यात उबाठा शिवसेनेला या दोन मतदारसंघात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी झगडावे लागणार आहे. शिरोळमधून महायुतीकडून आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर तर ‘मविआ’कडून शिरोळ साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी काँग्रेसमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात प्रमुख तिरंगी सामना रंगणार आहे.

कोल्हापूर उत्तरमधील ‘मविआ’चा अंतर्गत गृहकलह शांत होणार

कोल्हापूर उत्तरमध्येही काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा सुटला असला तरी या मतदारसंघातून सुरुवातीस काँग्रेसची उमेदवारी जाहीर केलेल्या राजेश लाटकर यांच्यासह मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माघारीच्या अखेरच्या क्षणी हे दोन्ही उमेदवार कोणती भूमिका घेणार ? याच्यावर काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांना मिळणाऱ्या मतांची बेरीज अवलंबून आहे. याउलट उमेदवारीवरून महायुतीमध्ये सुरु असलेला गृहकलह शांत झाल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना भाजपची पूर्णपणे ताकद मिळणार आहे. कागल आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र मविआ आणि महायुतीमध्ये एकास एक लढत होणार आहे.

इचलकरंजीत ‘आमच ठरलयं’ चा फॉर्म्युला राबणार

इचलकरंजी मतदारसंघातून भाजपकडून राहूल आवाडे, मविआकडून शरद पवार राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांनी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही बंडखोरी आवाडे यांना त्रासाची ठरणार आहे. तसेच इचलकरंजीचे माजी नगरसेवक संजय तेलनाडे आणि भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांची बंडखोरी अखेरच्या क्षणी टळली आहे. दरम्यान उघड बंड शमले असले तरी त्यांची अंतर्गत रसद ही शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार मदन कारंडे यांना देण्याच्या हालचाली सुरु आहेत.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article