For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लाडक्या दादांसाठी महायुतीतच चक्रव्यूह !

06:19 AM Sep 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
लाडक्या दादांसाठी महायुतीतच चक्रव्यूह
Advertisement

महायुतीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बाहेर पडण्यासाठी शिवसेना आणि भाजपकडूनच चक्रव्युह रचले जात असल्याच्या बातम्यांनी महाराष्ट्राचे राजकारण  चांगलेच ढवळून निघाले. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर घड्याळ तेच वेळ नवी म्हणत दादांनी राज्यातील जनतेला साद घातली. मात्र जनतेने अजित दादांना स्विकारले नाही. दादांसोबत गेलेले आमदार शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटी घेत आहेत. तब्बल 18 वर्षांनी शरद पवारांनी काल चिपळूणमध्ये सभा घेतली. चिपळूणचे विद्यमान आमदार शेखर निकम हे राष्ट्रवादीचे असून सध्या ते अजित दादांसोबत आहेत. त्यामुळे हसन मुश्रीफ, मकरंद पाटील, दिलीप वळसे-पाटील या अजितदादांसोबत गेलेल्या सगळ्याच नेत्यांच्या मतदार संघात शरद पवारांनी पर्यायी तगडे नेतृत्व देण्यास सुरूवात केली आहे. अजित पवार यांना आता एकीकडे काकांचे आव्हान तर दुसरीकडे महायुतीतून त्यांच्या विरोधात चक्रव्युह तयार केले जात आहे. त्यामुळे अजित पवारांना महायुती ठेवणार का? की दादा स्वत: बाहेर पडणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement

शिवसेनेत फुट पडल्यामुळे राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर 2 जुलै 2023 ला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फुट पडली. 9 मंत्र्यांसह अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात केव्हाही जाऊ शकते. त्यामुळेच अजित पवार हे महायुतीचे पुढचे पर्यायी मुख्यमंत्री असल्याची जोरदार चर्चा होती. या घटनेला अवघे दीड वर्षे पण झाली नसतील, तोवर आता महायुतीतूनच अजित पवार यांना बाहेर पडण्यासाठी चक्रव्यूह रचत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्याचा दौरा करणार आहेत. एकीकडे निवडणूक आयोगाने तयारी सुरू केलेली असताना दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीतही जागावाटपावऊन घोळ कायम आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच घटकपक्षांना आपलाच मुख्यमंत्री करायचा आहे. त्यामुळे युती आणि आघाडीच्या धर्मापेक्षा आपल्याला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील यासाठीच्या वाटाघाटी सुरू झाल्या आहेत, त्यातच आता अजित पवार यांच्या महायुतीतील स्थानाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Advertisement

काकांना सोडल्यानंतर झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत दादांच्या ताकदीचा अंदाज सगळ्यांनी घेतला. लोकसभेला किमान राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या प. महाराष्ट्रात अजित पवार यांचा फायदा होईल असे भाजपला वाटले होते, मात्र तसा काही फायदा झाला नाही. अजित पवार स्वत:च्या पत्नीला निवडून आणू शकले नाहीत, त्यातच अजित पवार रोखठोख त्यांच्या जे पोटात तेच ओठात असते. लोकसभेला आपण घरातच उमेदवार देऊन चुक केली, जो नात्यात लढतो त्याला समाज स्विकारत नसल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे कुठे तरी त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्येच अस्वस्थता वाढली. कॅप्टनच असे बोलू लागला तर बाकीच्यांनी करायचे काय, अजित पवार महायुतीत आल्यापासून कधी भाजप विरूध्द राष्ट्रवादी तर कधी शिवसेना विरूध्द राष्ट्रवादी असा अंतर्गत संघर्षच पहायला मिळाला. त्यात अमोल मिटकरी आघाडीवर होते.

राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शरद पवारांनी लोकसभेला राज्यातील सर्व भागात उमेदवार उभे कऊन निवडून आणले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी शरद पवारांचे वर्चस्व संपुष्टात आणणाऱ्या भाजप खासदार रामदास तडस यांनाही या निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवारांनी अमर काळे यांना उमेदवारी देऊन अस्मान दाखवले. शरद पवार योग्यवेळी हिशोब चुकता करतात हे लोकसभा निवडणुकीत त्यांनी दाखवून दिले. लोकसभा निवडणुकीत भाजपला कळले की उध्दव ठाकरेंना एकनाथ शिंदे जसे पर्याय ठरले तसे शरद पवारांना अजित पवार हे पर्याय ठरू शकत नाहीत. त्यामुळे आता एकीकडे काका तर दुसरीकडे महायुतीतील स्थान टिकवण्याचे आव्हान दादांपुढे आहे. अजित पवारांच्या महायुतीत येण्याने जसा भाजपला फायदा झाला नाही, तसा शिवसेनेला देखील सतत टीका सहन करावी लागली. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना अजित पवार निधी देत नसल्याची बोंबाबोंब करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना पुन्हा अजित पवारांकडेच निधी मागण्याची वेळ आली, त्यातच भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे या शिवसेनेच्या रायगडच्या आमदारांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात नाराजी दाखविली.

अजित पवारांच्या महायुतीत येण्याने पुन्हा आदिती तटकरे याच जिह्याच्या पालकमंत्री झाल्या, अजित पवारांच्या महायुतीत येण्याने शिंदेंच्या शिवसेनेला देखील हिंदुत्वाच्या विचारांवऊन सातत्याने टीका सहन करावी लागली. अजित दादा महायुतीत आले नसते तर, आज संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली असती मात्र, आता गोगावले आणि शिरसाट यांना मंत्रीपदाचा दर्जा असणारे महामंडळ देण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मैत्री ही राजकारणापलीकडची, फडणवीसांना राज्यातील राजकारणात शरद पवार हे नेहमी अडचण ठरत असल्याने, देवा भाऊंनी अजित दादांना नेहमीच जपले. महाराष्ट्र त्यांचा पहाटेचा शपथविधी विसरलेला नाही. फडणवीसांना केव्हाही एकनाथ शिंदेंपेक्षा दादाच जवळचे वाटतात. विशेष म्हणजे अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस पण एकाच दिवशी. त्यामुळे शरद पवारांना शह देण्यासाठी अजित दादांना महायुतीत आणले, मात्र लोकसभेला दादांच्या पत्नींचा पराभव झाला, आज दादांसोबत गेलेल्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. बहुतांश आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे, मात्र शरद पवार हे या सगळ्या खेळात मातब्बर असल्याने ते योग्यवेळी धक्कातंत्राचा वापर करणार, असे भासते आहे.

महाराष्ट्रात गेली 5 वर्षे सगळ्यात जास्त आमदार असताना भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही, मात्र यावेळी भाजपने मुख्यमंत्री करण्यासाठी 164 जागा लढण्याची तयारी केली आहे. उर्वरीत जागेत शिवसेना शिंदे हे भाजपचा मुख्यमंत्री करण्यासाठी मदत करू शकतात. त्यामुळे उध्दव ठाकरेंना पर्याय ठरणाऱ्या शिंदेंना भाजप बळ देणार मात्र, सरकारमध्ये ज्या अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे असलेल्या महिला बालकल्याण खात्याने लाडकी बहीण योजना आणली, त्याच बहिणीचे लाडके दादा आता महायुतीला नकोसे झाले आहेत.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.