For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचाच गुलाल

06:58 AM Feb 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचाच गुलाल
Advertisement

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजप-शिंदे शिवसेनेची चमक : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीही सरशी

Advertisement

प्रतिनिधी, मुंबई :

विधानसभा, महापालिका निवडणुकीत मुसंडी मारल्यानंतर मिनी विधानसभा म्हणून गणल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही महायुतीचीच सरशी झाली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला जनतेने निर्विवाद कौल दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये महायुतीनेच विजयाचा गुलाल उधळला आहे.

Advertisement

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने 731 जागा जिंकल्या, तर शिंदे सेनेने 185 जागा काबीज केल्या आहेत. राष्ट्रवादी 107, काँग्रेस 97, शिवसेना ठाकरे 42, राष्ट्रवादी शरद पवार 26 आणि इतर 15 असा जिल्हा परिषदांचा निकाल सायंकाळपर्यंत आलेल्या आकडेवारीमधून समोर आला.

राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या 731 जागा आणि 125 पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 7 हजार 438 उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद झाले होते. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुऊवात झाल्यानंतर  पहिल्या एका तासात समोर आलेल्या कलांनुसार महायुतीचे उमेदवार सर्वत्र आघाडीवर असल्याचे दिसत होते. काही ठिकाणी ही आघाडी वरखाली होत होती. मात्र अखेर महायुतीनेच विजयावर शिक्कामोर्तब केले. सर्वत्र विजयाचा गुलाल महायुतीनेच उधळल्याचे स्पष्ट झाले.

प्रचाराच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात बारामती येथे मफत्यू झाला. अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचारदेखील बड्या नेत्यांनी केला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले. पवार कुटुंबीयातील शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, अजित दादांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची नुकतीच शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांनीदेखील प्रचारात भाग घेतला नाही. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रातील जनतेने मोठा पाठिंबा दिल्याचे दिसत आहे. अजित दादांच्या अकाली निधनामुळे जनतेच्या सहानुभूतीचा लाभ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेला दिसत आहे.

2017 मध्ये 12 जिल्हा परिषदांच्या 727 जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यावेळी भाजपने 141 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी शिवसेना एकत्र होती. तेव्हा शिवसेनेने 148 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने 126 जागांवर झेंडा फडकवला होता. तर संयुक्त राष्ट्रवादीने 217 जागी विजय संपादन केला होता.

शतप्रतिशत महायुती

राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीने काहीशी कच खाल्ल्यानंतर विधानसभा निवडणुकीत घेतलेली उभारी झेडपीपर्यंत टिकवली. त्यामुळे आता ग्राम पंचायतीच्या निवडणुका हेच महायुतीचे लक्ष राहणार आहे. ग्राम पंचायत निवडणूक जिंकल्यानंतर राज्यात शतप्रतिशत महायुती सिद्ध होणार आहे. महायुतीला त्यांच्या कामामुळे यश मिळाले हे निश्चित आहे. पण त्यात भर म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांनी जो संयम दाखविला, त्याचे फलित त्यांना मिळाले आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयम दाखवत जिल्हा परिषद निवडणूक प्रचार करणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे राज्यभरातल्या मतदारांची सहानुभूती त्यांना मिळाली. अजित पवारांचे प्रचाराच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी अपघाती निधन झाल्याने राष्ट्रवादीला सहानुभूती मिळणे साहजिकच होते. एकनाथ शिंदे यांनी टीकाकारांना नेहमीच संयमाने उत्तर दिले आहे. आम्ही कामाने उत्तर देतो, असे ते नेहमीच सांगतात. मुंबईत शिवसेना ठाकरेंची असली तरी राज्यभरात शिंदे सेना फॉर्मात आहे. या सगळ्याचा परिपाक म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचे यश असेच म्हणता येईल.

अजितदादा पवार यांच्या कार्याला आणि त्यांच्या अविरत परिश्रमांना जनतेने कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली आदरांजली : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया‘

जाहीर झालेले जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल म्हणजे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व आमचे नेते अजितदादा पवार यांच्या कार्याला आणि त्यांच्या अविरत परिश्रमांना जनतेने कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली आदरांजली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांचा कौल : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

कार्यकर्त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपची विचारधारा तळागाळात पोहोचवण्यासाठी रात्रीचा दिवस करत प्रचार करतात. मात्र यावेळी अजितदादांच्या निधनानंतर संवेदनशील मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीच्या प्रचारात भाग न घेण्याचे तसेच कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यानी  प्रचारात भाग घेतला नसला तरीही महायुती सरकारने जनतेच्या हितासाठी ताकदीने केलेल्या विकासकामांमुळे भाजप महायुतीच्या पारड्यात मतदारांनी भरभरून मते टाकल्याबद्दल चव्हाण यांनी मतदारांचे आभार मानले

अजितदादांना मत म्हणजेच महायुतीला मत : चंद्रशेखर बावनकुळे

जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीने चांगले यश मिळवले आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी चांगली कामगिरी केली आहे. यात अजित पवारांना मत म्हणजे महायुतीला मत असे वक्तव्य  मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे.

जनता आमच्या पाठीशी

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आजच्या निकालावर बोलताना म्हटले की, ’भाजप हा महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष ठरेल असे यापूर्वी बोललो होतो. महानगरपालिका प्रमाणेच जिल्हा परिषदेत सुद्धा सात जागेवर भाजपचे अध्यक्ष असतील. डबल इंजन सरकार जनतेपर्यंत घेऊन गेलो आणि जिल्हा परिषदेतही नवीन विकसित ग्रामीण महाराष्ट्र या माध्यमातून कामे होणार आहे. हे जनतेपर्यंत घेऊन गेलो. निवडणूक प्रचारादरम्यान ग्रामीण जनता राज्य आणि पेंद्र सरकारच्या पाठीशी उभी राहिली.

महाविकास आघाडीने आत्मपरिक्षण करावे

काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत दणका बसला आहे. याबाबतच्या प्रश्नावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडी खाली गेली आहे. आता टीका टिप्पणीवर महाराष्ट्र मत देत नाही, तर विकासाला मतदान करते. काँग्रेसने टीका टिप्पणी आणि निगेटिव्ह प्रचार केला. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारले. शरद पवारही महाविकास आघाडीला मार्गदर्शन करण्यात कमी पडले. महाविकास आघाडीसाठी वाईट निकाल आले आहे. त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे.

Advertisement
Tags :

.