Solapur Jain Mahavir Jayanti | सोलापुरात महावीर जयंतीचा उत्साह; १०० फुटी ध्वज आणि भव्य मिरवणुकीने वेधले लक्ष!
वर्धमान महावीर की जय"च्या जयघोषाने सोलापूर दुमदुमले;
सोलापूर: जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती सोलापूर शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या वर्षीच्या सोहळ्यात मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे रांगेत उभे राहून महिलांनी हातात पकडलेला १०० फुटी ध्वज यानिमित्ताने शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
मिरवणुकीमध्ये दिगंबर आणि श्वेतांबर या दोन्ही पंथांच्या भगवान महावीरांच्या मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. "वर्धमान महावीर की जय" अशा जयघोषाने अवघे सोलापूर दुमदुमून गेले होते.
मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजराने आणि लेझीमच्या तालावर तरुणाईने ठेका धरला होता. पारंपारिक वाद्यांच्या निनादामुळे वातावरणात एक वेगळीच चैतन्यशक्ती संचारली होती.
१०० फुटी झेंडा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.हा ध्वज जैन समाजाच्या एकतेचे आणि श्रद्धेचे प्रतीक म्हणून दिसत होता. दिगंबर भगवान आणि श्वेतांबर भगवान यांच्या पालख्यांचे ठिकठिकाणी पूजन करण्यात आले.दोन्ही समाजातील बांधवांनी एकत्र येत अहिंसेचा संदेश दिला. मिरवणुकीत पुष्पवृष्टी करून भगवान महावीरांचे स्वागत करण्यात आले. सोलापूरच्या या सोहळ्याने धार्मिक सलोख्याचे आणि समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवले.