‘महाविकास’ मैदानात...‘महायुती’कडून चाचपणी; शिंदे गटात संभ्रम अन् शांतता
महायुतीचा कोल्हापूर मतदारसंघातील जागा वाटपाचा तिढा सुटेना; : हातकणंगलेतही महायुतीचे वेट अँड वॉच ; माजी खासदार राजू शेट्टींना शिवसेना ठाकरे गटाच्या पाठबळाची चर्चा; अधिकृत घोषणेअभावी खासदार माने गटातही अस्वस्थता
कृष्णात चौगले कोल्हापूर
कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार असले तरी भाजपकडूनही जोरदार चाचपणी सुरु आहे. वेगवान राजकीय घडामोडी सुरु असताना शिंदे गटात मात्र संभ्रम आणि शांतता आहे. महाविकास आघाडीतून कोल्हापूरची जागा राष्ट्रीय काँग्रेसला दिली असून तेथून श्रीमंत शाहू छत्रपती मैदानात उतरले आहेत. हातकणगंले मतदारसंघात राजू शेट्टींनी महाविकास आघाडीसोबत जाण्यास नकार दिला असला तरी त्यांनी केवळ शिवसेना ठाकरे गटाचा पाठींबा मागितला आहे. पण ठाकरेंनी त्याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे तेथून ठाकरे गटाचा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार असल्यामुळे या दोन्ही जागांवर शिंदे गटाने हक्क सांगितला आहे. पण तेथे दुसरा चेहरा देता येईल काय ? याबाबत भाजपकडून अद्यापही हालचाली सुरुच आहे.
खासदार संजय मंडलिक यांच्यासाठी अडथळ्यांची शर्यत
गत निवडणुकीत कोल्हापुरातून शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक विजयी झाले होते. पण या निवडणुकीमध्ये त्यांना महायुतीमधून उमेदवारीसाठी झगडावे लागत आहे. सेना आमदारांबरोबरच ‘आपलं ठरलंय’ अशी भूमिका घेऊन मंडलिकांना साथ दिलेले काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीकडून मिळालेल्या अंतर्गत ताकदीमुळे गत निवडणुकीत मंडलिकांच्या विजयाची वाटचाल सुकर झाली. या ‘लाख’मोलाच्या विजयासाठी मतदारसंघातील अनेक दृश्य-अदृश्य शक्तींचेही मोठे योगदान लाभले होते. पण गेल्या पाच वर्षातील राजकीय स्थित्यंतरे पाहता खासदार मंडलिकांच्या पाठीशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष असलेली काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गटाची ताकद महाविकास आघाडीच्या उमेदवारास मिळणार आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप आणि जनसुराज्यशक्तीच्या ताकदीवर विजयाचे पैलतीर गाठण्यासाठी खासदार मंडलिकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे.
खासदार मानेंचा करिष्मा चालणार काय ?
हातकणंगलेच्या जागेवर महाविकास आघाडीतून सक्षम उमेदवार कोण ? याबाबत चाचपणी सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून काही नावांची चर्चा सुरु आहे. पण विरोधी उमेदवाराच्या तुलनेत त्यांची किती ताकद आहे, पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गतनिवडणुकीत हातकणंगलेतून माजी खासदार राजू शेट्टी व शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यातील लढतीत माने यांनी बाजी मारली होती. तत्कालीन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार सुरेश हाळवणकर, उल्हास पाटील यांच्यासह भाजप-शिवसेनेमधील बड्या नेत्यांनी शेट्टींच्या पराभवाचा उचललेला विडा, युवकांवर छाप पाडणारी मानेंची वक्तृत्वशैली, दिवंगत खासदार बाळासाहेब माने गटाची ताकद आणि अखेरच्या टप्प्यात जातीयवादापर्यंत पोहोचलेली निवडणूक त्यामुळे शेट्टींची हॅटट्रीक हुकली होती.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रभावहिन कार्यपद्धती आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळालेली निर्णायक मते देखील शेट्टींच्या पराभवास कारणीभूत ठरली होती. गत निवडणुकीतील अनुभव पाहता शेट्टींनी ‘एकला चलो रे’चा नारा देत मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यांना प्रतिसाद देखील चांगला आहे. त्यामुळे विकासकामांच्या मुद्यावर निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत असलेल्या खासदार मानेंचा 2024 च्या निवडणुकीमध्ये करिष्मा चालणार काय? याचे उत्तर जनतेच्या न्यायालयातून मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटाची बैठक
शिंदे गटातील जागा वाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नुकतीच प्रमुख नेत्यांची बैठक झाली आहे. बैठकीत महायुतीकडून शिंदे गटाला दिलेल्या मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याचे समजते. आठ जागांवरील उमेदवारीबाबत शिक्कामोर्तब झाले आहे. पण ईशान्य मुंबई आणि कोल्हापूरच्या जागेबाबत भाजप आग्रही असल्यामुळे या मतदारसंघाचा तिढा कायम आहे. पण खासदार मंडलिक यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच, अशी भूमिका घेऊन मतदारसंघ पिंजून काढला आहे. कोरोनानंतर तीन वर्षांत केलेल्या कोट्यावधींच्या विकासकामाच्या जोरावर त्यांनी रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे मंडलिकांना उमेदवारी दिली नाही तर प्रसंगी ते बंडखोरी देखील करू शकतात, याची जाणीव देखील महायुतीमधील नेत्यांना आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात खासदार मंडलिक यांची उमेदवारी निश्चित होऊ शकते.
राजवाड्यावरून प्रचाराचा झंजावात सुरू
महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या चिन्हावर श्रीमंत शाहू छत्रपती यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी राजवाड्यावरून प्रचाराचा झंजावात सुरु झाला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, संयोगीताराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, शहाजीराजे आणि यशराजराजे आदी राजघराण्यातील सदस्य प्रत्यक्ष प्रचार मैदानात उतरले आहेत. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या सुक्ष्म नियोजनाखाली प्रचाराचा आराखडा तयार करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि शिवसेनेचा उबाठा गट देखील सक्रीय झाल्यामुळे श्रीमंत शाहू छत्रपतींच्या प्रचारार्थ सुरु असलेल्या संपर्क दौऱ्यामध्ये मोठी राजकीय ताकद दिसून येत आहे. प्रचाराची प्रत्यक्ष रणधुमाळी सुरु झाल्यानंतर काँग्रेसच्या सहा आमदारांबरोबरच राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उबाठा गटाचे नेते जिंकण्याच्या तयारीनेच मैदानात उतरणार असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले