For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘महाविकास’च ठरलं, महायुतीचं घोडं अडलं! करवीर विधानसभा मतदारसंघातील चित्र

04:17 PM Jul 09, 2024 IST | Abhijeet Khandekar
‘महाविकास’च ठरलं  महायुतीचं घोडं अडलं  करवीर विधानसभा मतदारसंघातील चित्र
Karveer Constituency
Advertisement

काँग्रेसचे संभाव्य उमेदवार राहूल पाटील यांचे संपर्क दौरे सुरु; जनसुराज्यच्या दाव्याने शिवसेना शिंदे गटात संभ्रम

महायुतीमधून माजी आमदार चंद्रदीप नरके व संताजी घोरपडे इच्छूक

कृष्णात चौगले कोल्हापूर

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी करवीर मतदारसंघातून दिवंगत आमदार पी.एन.पाटील यांचे चिरंजीव, जि.प.चे माजी अध्यक्ष राहूल पाटील यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातून संपर्क दौरे सुरु करून महाविकास आघाडीकडून आपणच उमेदवार असल्याचे अप्रत्यक्षपणे संकेत दिले आहेत. नैसर्गिक हक्काने या मतदारसंघावर कॉंग्रेसचा अधिकार असल्यामुळे पाटील यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल. पण महायुतीमधून जागा वाटपाचे चित्र पाहता शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु केली असली तरी ‘जनसुराज्य’चे सर्वेसर्वा विनय कोरे यांनीही या मतदारसंघावर दावा केला आहे. जनसुराज्यचे संभाव्य उमेदवार संताजी घोरपडे यांच्याकडून गेल्या पाच वर्षापासून ‘मतपेरणी’ सुरु आहे. महायुतीमधील जागा वाटपाच्या घोळात मात्र काँग्रेसच्या राहूल पाटील यांनी संपर्क मोहिमेत आघाडी घेतली आहे.

Advertisement

ऑक्टोबर अखेरीस विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे मतदारसंघात संपर्क दौरे करण्यासाठी केवळ तीन महिने बाकी राहिले आहेत. त्यामुळे आमदार पी.एन.पाटील यांच्या निधनानंतर त्वरीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन राहूल पाटील यांना त्यांचे राजकीय वारसदार म्हणून निश्चित करण्यात आले. त्यामुळे राहूल पाटील यांनी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मतदारसंघात संपर्कदौरे सुरु केले आहेत. पश्चिम पन्हाळ्यापासून त्यांनी सुरु केलेल्या दौऱ्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा परिषद गट निहाय दौऱ्याचे नियोजन केले आहे. दिवंगत आमदार पी.एन.पाटील यांच्यावर निष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांची फळी त्यांच्यासोबत संपर्क दौऱ्यात दिसत आहे.

नरके यांच्याकडून बेरजेच्या राजकीय जोडण्या
लोकसभा निवडणुकीमध्ये करवीर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांना 71 हजार 803 चे मताधिक्य मिळाले आहे. यामध्ये काँग्रेसबरोबरच, शेकापचे माजी आमदार संपतराव पवार-पाटील, शिवसेना उबाठा गट आणि गोकुळचे संचालक चेतन नरके यांचेही मोठे योगदान आहे. लोकसभेतील हे मताधिक्य पाहता राहूल पाटील यांच्यासाठी ते फायद्याचे ठरणार आहे. तर चंद्रदीप नरके यांना आत्मचिंतन करायला लावणारे आहे. त्यामुळे मतांचा हा अपुरा दुरावा भरून काढण्याचे नरके यांच्यासमोर आव्हान आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून बेरजेच्या राजकारणासाठी जोडण्या लावल्या आहेत. गावनिहाय आराखडा तयार करून काही जुन्या नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याबरोबरच नवीन कार्यकर्ते कसे जोडता येतील यासाठी त्यांच्याकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

Advertisement

पडद्याआडची मदत मिळणार काय ?
माजी आमदार नरके यांचा मतदारसंघात जनसंपर्क चांगला आहे. सध्या आमदार नसताना देखील त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मतदारसंघात विकासकामे केली आहेत. कुंभी बँक, गोकुळ आदी सत्ताकेंद्रे विधानसभेच्या राजकारणात त्यांच्यासाठी फायद्याची ठरणार आहेत. पण यापूर्वी ज्या दोन निवडणुकांमध्ये नरके यशस्वी ठरले होते, त्यावेळी तडजोडीच्या राजकारणातून त्यांना पडद्याआडची मदत झाली होती. पण आता महाविकास आघाडी आणि महायुती अशी चुरशीची लढत होणार असल्यामुळे पक्षनिष्ठेला प्रथम प्राधान्य दिले जाणार असून पडद्याआडची मदत मिळवण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे.

पर्यायी चेहरा जनतेपर्यंत पोहोचवण्यामध्ये घोरपडे यशस्वी
संताजी घोरपडे यांच्याकडे जनसुराज्य शक्ती पक्षाचे करवीर विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाते. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी मतदारसंघात संपर्क दौरे सुरु केले असून गावांगावांतील धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रमांसह वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये ते आवर्जून हजेरी लावत आहेत. घोरपडे यांनी कोरोना महामारी काळात कोविड सेंटरच्या माध्यमातून मतदारसंघातील अनेक रूग्णांवर मोफत उपचार केले. गेल्या काही वर्षात कोपार्डे येथील व्हीजन हॉस्पीटल आणि फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून रूग्णांवर अल्पदरात उपचार केले आहेत. त्यांनी मतदारसंघातून काढलेल्या भव्य राम मंदिर रथयात्रेला जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. वृक्षारोपणाच्या माध्यमातून त्यांनी आजतागायत सुमारे 4500 झाडे वाढवली आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गावांत त्यांनी एक नवीन ओळख निर्माण केली आहे. करवीर महोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी लहान मुले, युवक, युवती, महिला वर्ग, तसेच वारकरी सांप्रदायासाठी विविध सांकृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून पर्यायी चेहरा मतदारसंघातील जनमाणसांपर्यंत पोहोचवण्यामध्ये ते यशस्वी झाले आहेत. समाजकार्याची किनार आणि जनसंपर्कामुळे त्यांच्याकडे युवकांची भक्कम फळी निर्माण झाली आहे. भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्याशी घोरपडे यांची घनिष्ठ राजकीय संबंध असल्यामुळे त्यांनी करवीर मतदारसंघातील विकासकामांसाठी कोट्यावधी रूपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे घोरपडे यांच्या आगामी राजकीय वाटचालीत या दोन्ही नेत्यांचे त्यांना विशेष सहकार्य लाभाणार आहे.

Advertisement
Tags :

.