For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाविकास आघाडीची हवा गेली पण शिंदेंची वाढली!

06:14 AM Jun 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
महाविकास आघाडीची हवा गेली पण शिंदेंची वाढली
Advertisement

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाशी जवळीक असणारी मंडळी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीच्या तिकिटावर बिनविरोध झाल्याचे उघड होतानाच महाविकास आघाडीची हवा गेली हे स्पष्ट झाले. 17 पैकी पाच उमेदवार बिनविरोध होणे हा मोठाच धक्का. ठाकरे सेनेने ज्यांना उमेदवारी दिली त्यांनीच तोंडावर पाडले. पुण्यात लढाईची इच्छा असूनही काँग्रेसला राष्ट्रवादीने वाव ठेवला नाही. एकूणच विरोधी पक्षाची हवा गेली. शरद पवार उद्धव ठाकरे ही राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्वे पण या काळात तुलनेने नवख्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हवा वाढल्याचे मात्र स्पष्ट दिसून आले. अर्थात हा सत्तांतर्गत मामला!

Advertisement

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर अहिल्यानगर जिह्यातून प्रसाद तनपुरे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांचे मामा व राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर शंका घेतली जाऊ लागली. शंकेचा असा त्रास होणे जयंत पाटलांच्या पाचवीला पुजलेले असावे. पण, याच काळात भाजपची उमेदवारी जाहीर होताना सुप्रिया सुळे यांच्या होणाऱ्या व्याह्याचेही नाव भाजपच्या यादीत झळकत होते. अशावेळी महाविकास आघाडी काय बोलणार? अर्थातच पवार पक्ष डळमळीत होणार हे स्पष्ट होते. तरीही महाविकास आघाडीने उमेदवार देण्याचे चांगले प्रयत्न केले. मात्र पुण्यात अजित पवार राष्ट्रवादीने खासदार संजय काकडे यांच्या पुत्राला उमेदवारी देताना पवार राष्ट्रवादीने हट्टून मागून घेतलेला हा मतदारसंघ सोडून दिला. काँग्रेसचे शहराध्यक्ष जगताप यांना विनाकारण त्यामुळे शह मिळाला. आता आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्यांना पुढे अजून झटावे लागेल. अशा घटनांमुळेच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील लढतीपेक्षा उमेदवारी अर्ज माघारीची अधिक चर्चा रंगली आहे. आघाडीतील समन्वयाचा अभाव, बंडखोरी आणि परस्पर अविश्वास उघड झाला. परिणामी महायुतीला सहा जागांवर बिनविरोध विजय मिळविण्यात यश आले. बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत नाराजी आहे. नाशिकमध्ये भाजपला बंडखोर उमेदवाराचा सामना करावा लागत असला तरी महाविकास आघाडीतील गोंधळामुळे विरोधकांना अपेक्षित लाभ मिळताना दिसला नाही. उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार न घेतल्याने तेथील निवडणूक समीकरणे बदलली आहेत. सोलापूरमध्येही अर्ज माघारीच्या शेवटच्या टप्प्यात नाट्यामय घडामोडी घडल्या. तीन उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली. भाजप आमदारांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष आरोप करत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक अधिक चुरशीची बनली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून भाजपवर आर्थिक प्रलोभनांचे आरोप झाले. या आरोपांना अद्याप अधिकृत पुरावे समोर आलेले नाहीत. ते येतही नसतात! पण, निवडणूक निकालांपूर्वीच राजकीय मानसशास्त्राच्या लढाईत महायुतीने आघाडी घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अर्थातच यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व बाजूनी आपणच खेळायचे हे कसब देखील त्यांचे चातुर्य सिद्ध करणारे आहे. राज्यातील सध्याची सत्ता स्पर्धा मात्र विरोधक विरुद्ध फडणवीस अशी होताना दिसत नाही तर ती एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस होते आहे की काय, असे सध्याचे वातावरण आहे. हे स्पष्ट दिसत असले तरी कोणी बोलत नाही. कारण यात जसे ठाकरे, पवार या नेतृत्व ऐवजी दुसऱ्या आडनावांच्या नेतृत्वाकडे महाराष्ट्राची निर्णयाची सुत्रे चाललेली आहेत आणि काळ जाईल तशी त्यात वाढ होत आहे.

Advertisement

परिणामी प्राधान्याने फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि तेथे जागा नसेल तर शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास बहुतांश मंडळी प्राधान्य देताना दिसत आहेत. हा बदल निवडणुकांच्या निकालांमध्ये सुद्धा दिसून येत आहे. याचा परिणाम जसा महाराष्ट्रात होतोय तसा दिल्लीत असणाऱ्या विरोधकांच्या खासदारांवरही झाला आहे. ठाकरे सेनेचे अनेक खासदार एकनाथ शिंदे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाच्या प्रेमात असणे आणि इतर पक्षांच्या खासदारानाही शिंदेंचा पाहुणचार हवाहवासा वाटणे हे सध्याचे वास्तव आहे. ज्याची अस्वस्थता महाराष्ट्रातील इतर पक्षांच्या नेतृत्वाच्या मनात चलबिचल निर्माण करत आहे.

शिंदेंनी काबीज केलेला अवघा मुलुख

एकीकडे दिल्लीत शिंदेंचे काय झाले याची चर्चा रंगत असताना मुंबईत परतून त्यांनी काय मिळवले याकडे दुर्लक्ष होऊ नये. खा. सुनील तटकरेंना धक्का देऊन रायगड पालकमंत्रीपद कसे घेतले तर अनिकेत तटकरे यांच्या विरोधात आमदारांच्या कन्येला बंडखोरी करायला लावली. नंतर ती मागे घेताना पालकमंत्रीपद मिळवले.

आता कोकणचा नकाशा पाहिला तर नवी मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी ते सातारा एकहाती वर्चस्व, पालघरचा दबदबा, संभाजी नगरमध्ये अस्तित्व आणि नाशिकमध्ये प्रभाव हे लक्षात घेतले शिवाय ठाणे आणि त्याच्या जवळच्या महापालिकांमध्ये मोठे अस्तित्व याचा विचार करता अनेक ठिकाणी शिंदे यांच्या उमेदवारांनी माघार घेऊन जे साधले तेवढेच पवार आणि ठाकरेंना गमवावे लागले. नेतृत्व उत्तुंग असले तरी सध्याच्या राजकारणात ठाकरे पवारांच्या पेक्षा शिंदे फडणवीस यांची चर्चा अधिक आहे ती केवळ ते सत्तेवर आहेत म्हणून नव्हे तर नव्या काळात सगळेच उत्तुंग नेते सत्ताधाऱ्यांबरोबरच स्वकीयांच्या मतलबी राजकारणाने हतबल झाल्यामुळेच!

शिवराज काटकर

Advertisement
Tags :

.