Sangli News : महाविकास आघाडीची अद्यापही अजित पवार गटाशी आघाडी नाही
सांगलीत महाविकास आघाडीची बैठकांवर बैठक
सांगली : काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या दोन्ही पक्षांची मिळून झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा रविवारी ही बैठकावर बैठकांचा सत्र सुरू होते. या दोन्ही पक्षांनी आपल्यातील निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांवर विशेष लक्ष दिले आहे. दरम्यान राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाचे मंत्री मकरंद पाटील दोन दिवसापासून सांगलीत तळ ठोकून आहेत. त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे खासदार विशाल पाटील काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्याशी चर्चा सुरू ठेवली आहे.
दरम्यान महाविकास आघाडीबरोबर राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्ष लढणार का या मैत्रीपूर्ण लढती होणार याकडे मात्र कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले. दरम्यान अधिकृत सूत्रानुसार सध्याच्या स्थितीत कोणतीही आघाडी झाली नसल्याचे आघाडीकडून स्पष्ट केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाच्या इच्छुकांना सोमवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पक्षाकडून एबी फॉर्म लवकरच देण्यात येईल असेही त्यांना स्पष्ट केले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांची जी महाविकास आघाडी झाली आहे. या आघाडीने भाजपकडून डावलणाऱ्या आणि विजय होण्याची पात्रता असणाऱ्या उमेदवारांच्या वरही लक्ष ठेवले आहे. या उमेदवारांना आपल्याकडे खेचण्यासाठी फिल्डिंग लावली आहे.
त्यामुळे काही प्रभागात अनपेक्षितरित्या भाजपचे उमेदवार काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढलेला दिसणार आहे. भाजपने आपले उमेदवार फुटू नयेत याची दक्षता घेतली असतानाही या पक्षातील बातम्या आघाडीच्या नेत्यांपर्यंतसहजपणे पोहोचत आहेत. भाजप तुझी उमेदवारी डावलणार असा मेसेज या इच्छुकांपर्यंत आघाडीच्या नेत्यांकडून पोचलाही जात आहे, लवकर निर्णय घे अशा सूचनाही इच्छुकांना गेल्या आहेत. दरम्यान काँग्रेसने ३५ जागांवर उमेदवारी फिक्स केल्याचे सध्या दिसून येत आहे.
तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने ३० जागांवर निवडणूक लढवण्याचे फिक्स केले आहे. काही जागांबाबत अद्याप वाद आहे यामध्ये आणखी एक प्रकार सुरू आहे तो म्हणजे पै पाहुण्यांचा. समोरच्या पक्षात जर आपला पै पाहुणा आहे तर त्याला निवडून आणण्यासाठी आपल्या पक्षातील कमजोर उमेदवारांना उमदेवारी द्यायची असा एक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अनेक निष्ठावंतांवर अन्याय होतोय अशी स्थितीही झाली असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.
मिरजेत अनेक प्रभागात आघाडीकडे प्रबळ उमेदवार नसल्याने याठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्या उमेदवाराशी मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय झाल्याचे समजते, परंतु सांगली कुपवाडमध्ये मैत्रीपूर्ण लढतीला नकार दिला. आघाडीने उमेदवारावर लक्ष ठेवले असून इच्छुकाचे काम, लोकप्रियता, जिंकून येण्याची क्षमता, लोकसंपर्क त्याच्या जातीचे मतदान यावर लक्ष ठेवून उमेदवार दिला जात आहे. ज्या प्रभागात ज्या जातीचे मतदान अधिक त्या प्रभागात त्या जातीच्या उमेदवाराला प्रथम संधी, असा फॉर्म्युला ठरला आहे.
आयारामाना संधी
भाजपमधून निवडून येण्याची पात्रता असणाऱ्या आयारामांना संधी देण्याचाही निर्णय घेतला आहे त्यामुळे अद्याप १७ ते १८ जागांच्या बाबतीत निर्णय आघाडीने घेतलेला नाही फक्त चर्चा सुरू आहेत यामुळे आदेश जोपर्यंत येत नाही तोपर्यंत उमेदवारांना धाकधूक लागली आहे.