एक-दीड महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार
ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात विश्वास
प्रतिनिधी / मुंबई
सरकारने अकरा दिवसात जे महाराष्ट्राच्या मुळावर उठणारे निर्णय घेतले आहेत. ते सर्व निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही. भाजपाचे हिंदुत्व हे बेगडी असून आगामी एक-दीड महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ते दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करत होते. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येत असून विद्यमान महायुती सरकारमधील घोटाळे आणि भ्रष्टाचारावर ठाकरे यांनी जोरदार टीका केली. मुंबईतील धारावी प्रकल्प, गिरणी कामगार, मराठी माणूस आणि शिवसेना फुटीवरील निर्णयाला होणारा विलंब यावरून ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकार आले की, धारावीत मुंबई बाहेर गेलेल्या मराठी माणसांना, गिरणी कामगांराना त्याचप्रमाणे पोलीसांनाही घरे देणार असल्याचे सांगितले. सत्तेत आल्यावर धारावीची निविदा रद्द केली जाणार. त्याचवेळी विद्यामान सत्ताधीशांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातील. अधिकाऱ्यांनीही सत्ताधिशांच्या मनमानीला बळी पडू नये. त्यांच्या विरोधातही कारवाई केली जाणार असल्याचे ठाकरे म्हणाले. तसेच वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील सरकारी कर्मचाऱ्यांना तिथेच घरे देण्याचा महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयाची पुन्हा सरकार आल्यानंतर अंमलबजावणी करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच शिवसैनिकांना मराठी माणसाच्या एकजुटीची शपथ देत शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी मशाल धगधगत ठेवण्याची शपथ यावेळी त्यांनी दिली
शिवसेना फुटीच्या निर्णयाला होणाऱ्या विलंबावरून :
सरन्यायाधीश चंद्रचूड हे 8 नोव्हेंबरला निवृत्त होत असून त्यांच्या निवृत्तीपर्यंत निकाल लागेल की नाही, याबाबत ठाकरे यांनी साशंकता व्यक्त केली. ठाकरे म्हणाले की, इतिसाहात नोंद व्हावी असें वाटत असल्यास न्या. चंद्रचूड लगेचच निकाल द्यावा. न्यायदेवतेच्या डोळ्यावर काळीपट्टी असली तरी न्यायदेवता सारे बघत आहे. सारी लोकशाही सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडे अपेक्षेने बघत असल्याचे ठाकरे म्हणाले. तीन तीन सरन्यायाधीश झाले पण ते निकाल देऊ शकले नाहीत ही लोकशाहीची थट्टा असल्याची टीका ठाकरे यांनी यावेळी केली. तसेच न्यायमंदिरात प्रवेश करता तेव्हा योग्य न्याय द्या हीच अपेक्षा असून या जगातील अशी विचित्र परिस्थिती आहे असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.
जिह्याजिह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर :
विधानसभा निवडणुकीत सरकार आल्यावर राज्यातील प्रत्येक जिह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार असल्याचे सांगत महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील प्रत्येक राज्यात शिवरायांची मंदिरे बांधण्यासाठी आणि त्या मंदिर परिसरात महाराजांच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग चित्रस्वरूपात साकारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले