इचलकरंजीत Mahavikas Aghadi साठी अस्तित्वाची लढाई, महापालिका शेवटची संधी?
गेल्या काही महिन्यात इचलकरंजीच्या राजकीय पुला खालून बरेच पाणी वाहून गेलंय
इचलकरंजी : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता आगामी महापालिका निवडणुका या महाविकास आघाडीसाठी अस्तित्व दाखवण्याची शेवटची संधी असणार आहे. गतवेळच्या दोनही निवडणुकीत पराभव होऊनही मिळालेली मते, आमदार सतेज पाटील यांचे नेतृत्व, अजूनही पदाधिकाऱ्यात राहिलेली एकी अशा काही सकारात्मक बाजू असतानाही आवाडे - हाळवणकरांमुळे भाजपची वाढलेली ताकद, महायुतीत वाढलेले पक्षप्रवेश आदी बाबींवर मात करत महाविकास आघाडीस वाटचाल करावी लागणार आहे.
गतवेळी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत इचलकरंजीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला होता. लोकसभा निवडणुकीत इचलकरंजीसाठी नवखा उमेदवार असलेल्या सत्यजित पाटील- सरूडकर यांना तब्बल 90 हजार मते देऊन आघाडीने स्वतंत्र अस्तित्व दाखवून दिले.
त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही मविआ एकसंध राहिल्यानेच राष्ट्रवादीचे उमेदवार मदन कारंडे यांना 75 हजार मते मिळवता आली. या दोन्ही निवडणुकीतील पराभवानंतरही वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे पदाधिकारी त्यांची एकी अबाधित असल्याचे दाखवण्यात अजूनपर्यंत तरी यशस्वी झाले आहेत.
गेल्या काही महिन्यात इचलकरंजीच्या राजकीय पुला खालून बरेच पाणी वाहून गेले आहे. महाविकास आघाडीला पडझडीचा पहिला फटका बसला तो माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रवेशानंतर. जांभळे गटाने दोन्ही निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चांगले मताधिक्य दिले होते. पण, हा गट आता महायुतीमध्ये गेल्यामुळे मविआसाठी हा फटका असणार आहे.
सद्यस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, आप, कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी संघटना तसेच मँचेस्टर आघाडीतील नेत्यांकडून शहरातील महाविकास आघाडीची धुरा सांभाळली जात आहे. पण सद्यस्थितीत त्यांच्यामागे आमदार सतेज पाटील वगळता जिह्यातील अन्य कोणतेही नेतृत्व दिसत नाही.
उलट पक्षी महायुतीकडे भाजपच्या माध्यमातून प्रकाश आवाडे व सुरेश हाळवणकर गटाची ताकद एकवटली आहे. आमदार राहुल आवाडे यांना मिळालेले विक्रमी मताधिक्य हे त्यांचे बलस्थान आहे. राज्यात व केंद्रातही महायुतीची सत्ता असून जिह्यातील मंत्री प्रकाश आबिटकर, हसन मुश्रीफ यांचे इचलकरंजीवर विशेष लक्ष आहे.
तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाची बांधणी सुरू आहे . या पार्श्वभूमीवर आता महापालिका निवडणुकीपर्यंत जादाची पडझड न होता महायुतीला टक्कर देण्यासाठी सज्ज होण्याचे आव्हान महाविकास आघाडीसमोर आहे.
सध्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षात इनकमिंग, आउटगोइंग सुरू झाले आहे. याचा फटका बहुतांशी महाविकास आघाडीला बसत आहे. आगामी काळातही महाविकास आघाडीचे काही शिलेदार फुटून महायुतीत जाणार असल्याच्या चर्चा आत्तापासूनच सुरू झाल्या आहेत. तसे झाल्यास महापालिका निवडणुकीत अस्तित्व राखण्याचे आव्हान महाविकास आघाडीला आणखीनच अवघड असणार आहे .
महायुतीकडून मविआच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षापेक्षा व्यक्तिला प्राधान्य देण्याची मतदारांची मानसिकता सर्वश्रुत आहे. या अनुषंगाने महायुतीच्या नेत्यांकडून प्रभागात निर्णायक मतांची ताकद असलेल्या महाविकास आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. यामध्ये काही जणांना गळाला लावून संख्याबळ वाढवण्याचा हेतू स्पष्ट आहे. यामुळे अलर्ट झालेल्या माविआकडून बैठक घेऊन चाचपणी सुरू आहे. पण या गदारोळात नेमके काय झाले हे निवडणुकीवेळीच समजणार आहे.
शहर विकास आघाडीचा पर्याय
महायुतीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून विविध पर्यायांची चाचपणी केली जात आहे. यामध्ये शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व उमेदवारांनी एकाच चिन्हाखाली निवडणूक लढवण्याचा विषय गतवेळच्या बैठकीत आला होता. यावेळी शहर विकास आघाडीत सर्व पक्षीयांसाठी दारे खुली असल्याचेही सुतोवाच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले होते. त्यामुळे मोठी संख्या असलेल्या महायुती मधील नाराज घटकांना सामावून घेऊन ताकद वाढवण्याचा पर्याय शहर विकास आघाडीच्या माध्यमातून दिसून येत आहे.