शिवाजी पार्कचा 3 कोटीचा विकास निधी पळवणाऱ्यांना जाब विचारावा : राजू लाटकर
महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ मेळावा
कोल्हापूर : प्रतिनिधी
शिवाजी पार्कसाठी 3 कोटीचा विकास निधी मंजूर करून आणला होता. तो विरोधकांनी पळवला. आता मते मागायला येणार्या विरोधकांना याचा शिवाजी पार्कवासियांनी जाब विचारावा, असे आवाहन माजी नगरसेवक राजू लाटकर यांनी केले. दरम्यान, महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलेल्या विकास कामाची दखल घेऊन शाहू छत्रपतींना शिवाजी पार्क मधून सर्वाधिक मताधिक्क्य द्यावे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरातील शिवाजी पार्क येथे सभा झाली. त्यावेळी राजू लाटकर बोलत होते. यावेळी आमदार श्रीमती जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे, माजी महापौर सूरमंजिरी लाटकर आदी प्रमुख उपस्थित होते.
आमदार सतेज पाटील पुढे म्हणाले, निवडून गेल्यानंतर खासदार गेल्या पाच वर्षात एकदा तरी या भागात आले का, याचा विचार सर्वांनी करावा. या परिसरातील प्रत्येक कुटुंबाशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. शाहू छत्रपती आपल्याला नेहमी भेटत राहतील. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवाजी पार्क परिसरात अनेक विकासाची कामे केली आहेत. महापालिकेच्या माध्यमातूनही कामे झाली आहेत. यापुढे कोणत्याच समस्या या भागात राहणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल.
माजी आमदार मालोजीराजे म्हणाले, शाहू छत्रपती खासदार झाल्यानंतर राजू लाटकर तसेच आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांना आणखी गती येईल.
आमदार श्रीमती जयश्री जाधव, राजू पारीख, बाळ पाटणकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी नगरसेवक प्रवीण केसरकर, उद्योजक नीरज झंवर, तसेच सत्यजित कापडी, सचिन मालू, कुमार पाटील, स्नेहल कापसे, मिथुन धरमतर आदींसह शिवाजी पार्क परिसरात राहणारे उद्योजक, व्यापारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.