राम मंदिर झाले हे चांगले की वाईट, उद्धव ठाकरेंनी याचे उत्तर द्यावे..!
पश्चिम महाराष्ट्रातील सहकार मोडकळीस का आला? शरद पवारांनाही सवाल : विट्यात गृहमंत्री अमित शहा ललकारले
सचिन भादुले विटा
देशात राम मंदिर झाले, सीएए कायदा झाला, पीएफआयवर बंदी आली. या सर्व गोष्टी चांगल्या झाल्या की वाईट झाल्या, याचे उत्तर नकली शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी द्यावे. तर तुम्ही केंद्रात कृषिमंत्री असतानाही पश्चिम महाराष्ट्रातील सहकार का मोडकळीस आला, असा खडा सवाल गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला.
भाजपचे उमेदवार खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ महाविजय संकल्प सभा विट्यात पार पडली. यावेळी गृहमंत्री अमित शहा बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार श्वेता महाले, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपिचंद पडळकर, माजी आमदार सदाशिव पाटील, युवा नेते अमोल बाबर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
गृहमंत्री शहा म्हणाले, विरोधकांकडे पंतप्रधान पदासाठी उमेदवार कोण आहे?, शरद पवार, ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन, उद्धव ठाकरे कोण पंतप्रधान होणार आहे?, असा सवाल करीत इंडीया आघाडीतील एकजण जाहीरपणे प्रत्येक वर्षाला एक पंतप्रधान करण्याची भाषा करीत आहे. हे तुम्हाला मान्य आहे का?, असा परखड सवाल मंत्री शहा यांनी उपस्थित केला. एकीकडे 23 वर्षे मुख्यमंत्री म्हणून राहिल्यानंतर पंचवीस पैशाचाही भ्रष्टाचाराचा आरोप नसणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि दुसरीकडे भ्रष्टाचारी आघाडी आहे, अशी टिका शहा यांनी केली.
‘परिवारवाद की देशाचे कल्याण’
देशात सध्या दोन गट आहेत. एक गट राम मंदिर, सीएएला विरोध करणारा आहे, तर दुसरा गट राम मंदिर उभारणारा, सीएए कायदा आणणारा, काश्मिर मधून 370 कलम हटवणारा आहे. कोणाला साथ द्यायची याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. एका बाजूला परिवारवाद आहे. मुलगा आणि मुलीच्या कल्याणासाठी काम करणारे लोक, तर दुसरीकडे देशाच्या कल्याणासाठी काम करणारे प्रधानमंत्री आहेत.
‘काँग्रेसने सत्तर वर्षे राम मंदिराचा प्रश्न भिजत ठेवला’
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर देश जगात आर्थिक महासत्ता होणार आहेच, शिवाय देश सुरक्षित करण्याचे काम होणार आहे. गरिबांचे आयुष्य प्रकाशमय होणार आहे. काँग्रेसने सत्तर वर्षात राम मंदिराचा प्रश्न भिजत ठेवला. केवळ दुसऱ्या टर्ममध्येच मोदींनी राम मंदिर उभारले. पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीरामांचा सुर्यतिलक झाल्यानंतर देश भक्तीमय झाला. मात्र सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेवर बहिष्कार टाकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी लोकसभेत 33 टक्के आरक्षण मंजूर केले. कोरोनाचे लसीकरण मोफत केले. मात्र त्यामध्ये देखिल राहुल गांधी यांनी राजकारण केले. देशाला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, असे मंत्री शहा म्हणाले.
‘टेंभू योजना का रखडवली?’
आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना बंद का पडला?, टेंभू योजनेचे काम 1998 ते 2014 या कालावधीत का रखडले?, याचे उत्तर शरद पवार यांनी द्यावे, असे सांगत या योजनेसाठी गेल्या दहा वर्षात 2 हजार 109 कोटी रूपये मोदी सरकारने आणि राज्य सरकारने दिले. यामुळे दोन लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, असे मंत्री शहा म्हणाले.
‘दिल्लीमध्ये लढणारे खासदार’
दिल्लीमध्ये सांगलीसाठी लढताना आम्ही खासदार संजयकाकांना पाहिले आहे. टेंभू, म्हैशाळ योजना, जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, क्लस्टर योजना यासाठी तुमचे खासदार संजयकाका पाटील दिल्लीत नेहमीच लढत होते. दहा वर्षात त्यांनी चांगले काम केले आहे, असे गौरवोद्गार गृहमंत्री अमित शहा यांनी काढले.
रामदास आठवले म्हणाले, गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने चांगले काम केले आहे. त्यामुळेच रिपब्लिकन पक्षाने एनडीएला पाठींबा दिला आहे. खानापूर, आटपाडी तालुके माझ्या पुर्वीच्या मतदार संघातील आहेत. खासदार संजयकाका पाटील विजयाची हॅटट्रीक करतील, असा विश्वास मंत्री आठवले यांनी व्यक्त केला.
मोदींचा सैनिक म्हणून संधी द्या - खासदार पाटील
खासदार संजयकाका पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षे समर्पित भावनेने सत्ता वापरली. या निवडणुकीत आपण मोदींचा सैनिक म्हणून उमेदवारी केली आहे. दहा वर्षापूर्वी हा मतदारसंघ दुष्काळी होता. मात्र आता या मतदारसंघात सिंचन योजनांचे पाणी आले आहे. टेंभू, म्हैशाळच्या विस्तारीत योजनांना मंजुरी मिळाली आहे. मतदारसंघातून पाच राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. येणारी पाच वर्षे लोकांच्या सेवेसाठी आणि त्यांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून संधी पाहिजे, असे मत खासदार पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, भाजप महिला जिल्हाध्यक्ष उषाताई दशवंत, माजी आमदार रमेश शेंडगे, किरण तारळेकर, निताताई केळकर, फिरोज शेख यांनी मनोगत व्यक्त केले. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, भाजपचे प्रदेश संघटक मकरंद देशपांडे, माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैशाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, माजी सभापती ब्रह्मनंद पडळकर, अशोकराव गायकवाड, सुहास शिंदे, सचिन शिंदे, अनिल म. बाबर, शंकर मोहिते, विजय पाटील, हर्षवर्धन देशमुख उपस्थित होते.