गोकर्ण-मुर्डेश्वरसह अनेक ठिकाणी महाशिवरात्री उत्साहात
कारवार : जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील पंचक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकर्ण मुर्डेश्वर शेज्जेश्वर, धारेश्वर आणि गुणवंतेश्वर येथे महाशिवरात्रीचे पर्व मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले. दक्षिण भारतातील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध गोकर्ण येथील कथानकाशी जोडल्या जाणाऱ्या मुर्डेश्वर शेज्जेश्वर धारेश्वर आणि गुणवंतेश्वर येथील शिवरात्रोत्सवालाही गोकर्ण येथील शिवरात्रोत्सवाइतकेच महत्त्व दिले जाते. निसर्गसौंदर्याने नटलेल्या आणि देशातील संस्कृत अध्यायनाचे आघाडीचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकर्ण येथील महाबळेश्वर मंदिरातील आत्मलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
गोकर्णमध्ये दाखल झालेल्या भाविकांमध्ये केवळ कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातील शिवभक्तांचाच समावेश नव्हता तर देशातील अन्य राज्यातील भाविकांचा समावेश होता. काही भाविक तर मंगळवारीच गोकर्ण येथे दाखल झाले होते. देवदर्शनासाठी बुधवारी पहाटे चार वाजल्यापासूनच रांगा लागल्या होत्या. सकाळी 5 वाजल्यापासून देवदर्शनाला सुरुवात झाली. महाशिवरात्रीच्या दिवशी आत्मलिंगाचे दर्शन घेवून पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी गोकर्णमध्ये दाखल झालेल्या हजारो भाविकांनी पहिल्यांदा द्विमुख गणपतीचे दर्शन घेतले. महाशिवरात्रीचे औचित्य साधून गोकर्णमध्ये दाखल झालेल्या भाविकांनी महागणपती आणि आत्मलिंगा व्यतिरिक्त काळभैरव, शंकर, नारायण, ताम्रगौरी, वीरभद्रेश्वर आदी देवांचे दर्शन घेतले. येथील मुख्य न्यायाधीश विजयकुमारसह अन्य काही मान्यवरांनी आत्मलिंगाचे दर्शन घेतले. गोकर्ण येथील महाशिवरात्रोत्सवाला पाच, सहा दिवसांपासून सुरुवात झाली असून उत्सवाची सांगता समुद्रस्नान आणि महारथोत्सवाने होणार आहे.
मुर्डेश्वर येथे लाखो भाविक दाखल
संपूर्ण देशांतील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भटकळ तालुक्यातील मुर्डेश्वर येथे देवदर्शनासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत. मंदिरातील देवदर्शनासह येथील देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंचीची शंकराची मूर्ती आणि देशातील सर्वात उंच येथील गोपूर पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महाशिवरात्रीचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाने मुर्डेश्वर येथे मुर्डेश्वर उत्सवाचे आयोजन केले आहे.