For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महषी वाल्मिकी

06:00 AM Oct 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
महषी वाल्मिकी
Advertisement

प्रतिवषी आश्विन पौर्णिमेला महषी वाल्मिकी जयंती येते. महषी वाल्मिकींनी रामायण या महाकाव्याची रचना त्रेतायुगामध्ये केली. पूर्वायुष्यामध्ये वाल्मिकी रत्नाकर नावाने ओळखला जायचा आणि रानावनामध्ये दरोडेखोरी करायचा, येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना भीती दाखवून आणि धाक दाखवून लुटायचा. त्यांचे पैसे आणि दागिने काढून घ्यायचा. त्या पैशावर आपले घर चालवायचा. त्याला एकदा जंगलातून जात असताना नारदमुनींनी बघितले. नारदमुनी हे विष्णूचे भक्त होते. ते ‘नारायण नारायण’ हा नामजप करायचे.

Advertisement

नारदमुनींना रत्नाकराला बघून वाईट वाटले. रत्नाकर जर असेच पाप करू लागला, तर त्याला नरकात शिक्षा भोगावी लागेल म्हणून ते लगेच त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणाले, “अरे, तू हे पाप का करतोस? लोकांना त्रास देऊन त्यांचे पैसे घेणे हे पाप आहे.” त्यावर रत्नाकर म्हणाला, “मी हे पाप माझ्या बायको-मुलांना खायला-प्यायला मिळावे म्हणून करतो.” तेव्हा नारदमुनी म्हणाले, “तू त्यांच्यासाठी करतोस, तर मग जा. त्यांना विचार की, मी पाप करून तुम्हाला सांभाळतो, खाऊ पिऊ घालतो. तर माझ्या पापाचा अर्धा वाटा तुम्ही घेणार का?” रत्नाकर घरी गेला आणि त्याने आपल्या बायको-मुलांना विचारले. तेव्हा ती म्हणाली, “तुमच्या पापाचे फळ आम्ही भोगणार नाही. तुम्ही लोकांना त्रास देऊन पैसे मिळविता, तर त्याचे पाप तुम्ही भोगा.” हे ऐकल्यावर रत्नाकरला वाईट वाटले. आपण एवढी वर्षे निरपराध लोकांना फार त्रास दिला. त्याला त्याच्या कर्माचा पश्चात्ताप झाला. तो लगेच नारदमुनींना शरण गेला आणि म्हणाला, “आपण मला क्षमा करा. या घोर पापातून मला मुक्त करा.” तेव्हा नारदमुनी प्रेमाने म्हणाले, “अरे, तुला पश्चात्ताप होतोय ना? मग आता तुझ्या पापातून मुक्त होण्यासाठी तू ‘राम राम’ असा नामजप कर. जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तू इथेच नामजप करत बस. मी लगेच जाऊन येतो,” असे म्हणून नारदमुनी निघून गेले. आता रत्नाकर एका जागी बसून नामस्मरण करू लागला. अनेक वर्षे झाली पण नारदमुनी आले नाहीत. पण रत्नाकरचा नामजप अखंड चालूच होता. तो ज्या रानात बसला होता, तेथे रत्नाकरच्या शरीराभोवती  रानातील लाल मुंग्यांनी वारूळ बनविले, हळूहळू त्याचे सगळे शरीर मुंग्यांच्या वाऊळाखाली झाकले गेले. त्याने मनाशी निश्चय केला होता की, नारदमुनी येईपर्यंत मी इथेच नामस्मरण करत बसणार. असे न खाता-पिता शेकडो वर्षे नामजप करणाऱ्या रत्नाकराला भगवंत प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले, “मी तुझ्या नामस्मरणामुळे प्रसन्न झालो आहे. तुझे सगळे अपराध मी क्षमा करतो. तू आता चोर, दरोडेखोर राहिला नाहीस. आजपासून तू वाल्मिकी ऋषी आहेस. असे म्हणून भगवंतांनी त्याला आशीर्वाद दिले. याच वाल्मिकी ऋषींनी ‘रामायण’ लिहिले. वाल्मिकी ऋषी फार प्रेमळ होते. त्यांच्या आश्र्रमात वाघ आणि हरिणसुद्धा एकत्र राहायचे. हे सगळे कशामुळे झाले, तर नामस्मरणामुळे. यासाठी नारदमुनीसारख्या हरिभक्ताचा संग त्याला लाभला. नारदमुनींच्या सत्संगामुळे त्याला आपल्या पापाचा पश्चात्ताप झाला. म्हणजे हरिभक्तांच्या सत्संगामुळे आपण वाईट कर्मातून मुक्त होऊन मनुष्य जन्म शुद्धपणे जगू शकतो आणि परिपूर्ण करू शकतो.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजसुद्धा आपल्या अनेक अभंगातून वाल्मिकांचा नारद मुनीनी श्रीरामनाम जपण्यास सांगून कसा उद्धार केला यांचे वर्णन करतात. अंगीकार ज्याचा केला नारायणें । निंद्य तें हि तेणें वंद्य केलें ।।1।।अजामेळ भिल्ली तारीली कुंटणी । प्रत्यक्ष पुराणीं वंद्य केली ।।ध्रु.।। ब्रम्हहत्याराशी पातकें अपार । वाल्मीक किंकर वंद्य केला ।।2।। तुका म्हणे येथें भजन प्रमाण । काय थोरपण जाळावें तें ।।3।। अर्थात ‘ज्याचा अंगीकार नारायणाने केला ते जगात निंदनीय जरी असले तरी त्याने त्यांना वंदनीय केले. उदाहरण द्यायचे म्हटले तर अजामेळ, भिल्ल शबरी, गणिका वेश्या हे जरी पापी होते तरीही तुम्ही त्यांना तारले त्यांना वंदनीय केले हे तर प्रत्यक्ष पुराणात सांगितलेले आहे. ब्रह्महत्यांची रासच ज्याच्या हातातून घडली ज्याने अनेक महापातके केली अशा वाल्मिकींचादेखील तुम्ही उद्धार केला त्याला सर्वत्र वंदनीय केले. तुकाराम महाराज म्हणतात, ‘या नारायणाने या सर्वांचा अंगीकार केला कारण येथे केवळ हरिनाम भजन प्रमाण आहे बाकीचा मोठेपणा काय जाळायचा आहे काय ?’

Advertisement

अशाच आशयाच्या दुसऱ्या एका अभंगात ते म्हणतात, अनेक दोषांचे काट । जे जे गादले निघोंट । होती हरीनामें चोखट । क्षण एक न लगतां।।1।।तुम्ही हरी म्हणा हरी म्हणा । महादोषांचे छेदना।।ध्रु.।।अतिप्रीतीचा बांधला । नष्ट चांडाळीं रतला । क्षण न लगतां नेला । वैकुंठासी हरी म्हणता।।2।। अमित दोषाचें मूळ । झालें वाल्मीकासी सबळ । झाला हरीनामें निर्मळ । गंगाजळ पैं जैसा ।।3।। हरी म्हणतां तरले । महादोषी उद्धरिले । पहा गणिकेसी नेलें । वैकुंठासी हरी म्हणतां ।।4।। हरीविण जन्म नको वायां । जैसी दर्पणींची छाया । म्हणोनि तुका लागे पायां । शरण तया हरीसी ।।5।। अर्थात ‘अनेक दोषांनी व पापांनी जे मलिन झाले आहेत, असे लोकदेखील हरिनामामुळे शुद्ध होतात तेही एक क्षणदेखील न लागता. त्यामुळेच तुम्ही हरिनाम घ्या ते हरिनामच महादोषांना देखील छेदून टाकील. अजामेळासारखा दुष्ट मनुष्य चांडाळ जातीच्या स्त्रीशी रत झाला व तिच्याशी अति प्रीतीने बांधला गेला. त्याच्याकडून नकळत हरिनामाचा उच्चार झाला तरी देखील त्याला एक क्षणही न लागता विष्णुदासांनी वैकुंठाला नेला. वाल्मिकीच्या ठिकाणी तर अनेक महादोषांचे मूळ सबळ होऊन राहिले होते. परंतु तो देखील हरिनामाने अगदी निर्मळ झाला अगदी गंगाजळाप्रमाणे निर्मळ झाला. अनेक लोकांनी ‘हरी’ म्हटले व ते तरले. महादोषी देखील हरिनामामुळे उद्धरून गेले. पहा गणिकादेखील एक वेश्या होती तिने केवळ हरी म्हटल्यामुळे तिला वैकुंठाला नेले. तुकाराम महाराज म्हणतात, ‘जशी दर्पणेची छाया व्यर्थ असते त्याप्रमाणे हरिनामावाचून जन्म वाया जायला नको. म्हणून तर हा तुकाराम म्हणजे मी हरीच्या पायाशी लागलो आणि हरीला शरण गेलो आहे.’ त्याचप्रमाणे हरिनामाच्या साहाय्याने भगवद्प्राप्ती केलेल्या भक्तांच्या बरोबर वाल्मिकींचेही नाव येते, याबद्दल तुकाराम महाराज म्हणतात, अहल्या जेणें तारिली रामें । गणिका परलोका नेली नामें।।1।। रामकंठ शीतळ जपतां शूळपाणी । राम जपे अविनाश भवानी ।।2।। तारक मंत्र श्र्रवण काशी। नाम जपतां वाल्मीक ऋषि ।।3।। नामजप बीज मंत्र नळा । सिंधु तरती ज्याच्या प्रतापें शिळा ।।4।। नामजप जीवन मुनिजना । तुकयास्वामी रघुनंदना।।5।। अर्थात‘ज्या प्रभू रामचंद्रांनी अहिल्येचा उद्धार केला व नकळत रामाच्या नामाचा उच्चार केला त्या गणिकेलादेखील वैकुंठाला नेले, अशा प्रभू रामचंद्रांच्या नामाचा उच्चार ‘राम हरे रघुराज हरे  । राम हरे महाराज हरे’ असा करावा. ज्यावेळी भगवान शंकरानी मंथनातून बाहेर आलेले विष प्राशन केले त्यावेळी त्यांच्या कंठाचा दाह होऊ लागला व त्यावेळी प्रभू रामचंद्रांच्या नामाचा त्यांनी उच्चार केला व त्यांचा कंठ शीतल झाला व भवानी पार्वती माता देखील अविनाशी रामनामाचा जप नेहमी करते. रामनाम मंत्र हे तारक मंत्र असून काशीमध्ये ते श्र्रवण केल्यास आपल्याला पुण्य लाभते व याच रामनामाचा उच्चार करून महापापी वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला. याच बीजमंत्राचा उच्चार हनुमंत, नल, नील, सुग्रीव, जांबुवंत यांनी केला व हे रामनाम दगडावर लिहिले असता समुद्रावर ते दगड तरले. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या मुनीजनांचे जीवन म्हणजे रामनाम जप आहे तोच माझा स्वामी रघुनंदन आहे.’ मराठीमध्ये एक म्हण आहे वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला. अर्थात नामस्मरणाने एक दरोडेखोरसुद्धा इतिहासातील प्रसिद्ध महाकवी बनला. ज्याचे रामायण आजही घराघरामध्ये गायिले जाते.

-वृंदावनदास

Advertisement
Tags :

.