तिरुपतीमध्ये शुद्धीकरणासाठी महाशांती होम
मंदिरातील विवादानंतर प्रसाद बनविण्याचे स्वयंपाकघर पंचगव्याने केले शुद्ध
वृत्तसंस्था/ तिरुपती
आंध्रप्रदेशातील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराच्या शुद्धीकरणासाठी सोमवारी महाशांती होम (यज्ञ) करण्यात आला. तिरुमला तिरुपती देवस्थानम मंडळाच्या अधिकाऱ्यांसह 20 पुजारी सोमवारी सकाळी 6 ते 10 पर्यंत चाललेल्या पंचगव्य शुद्धीकरण होम प्रक्रियेमध्ये सहभागी झाले होते. या विधीदरम्यान लाडू आणि अन्नप्रसाद बनविण्यात येत असलेले स्वयंपाकघर शुद्ध करण्यात आले.
आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष टीडीपीने 18 सप्टेंबर रोजी राज्यातील वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात तिरुपती मंदिरात दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये (प्रसादम) प्राण्यांचे चरबीयुक्त तूप आणि माशाचे तेल मिसळल्याचा आरोप केला होता. दुसऱ्या दिवशी, टीडीपीने प्रयोगशाळेचा अहवाल सादर करत आपल्या आरोपांना दुजोरा दिल्यानंतर देशात खळबळ निर्माण झाली. त्यानंतर एकीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच सोमवारी स्वयंपाकघरासह मंदिर परिसराचे पंचगव्य महाशांती होमच्या माध्यमातून शुद्धीकरण करण्यात आले.
आता मंदिर पूर्णपणे शुद्ध : पुजारी
महाशांती यज्ञ पार पडल्यानंतर आता मंदिर पूर्णपणे शुद्ध झाल्याचा दावा मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांपैकी एक कृष्णा शेषचल दीक्षितुलु यांनी केला. मंदिराच्या शुद्धीकरणासाठी काय केले पाहिजे अशी विचारणा सरकारद्वारे करण्यात आली होती. त्यानंतर आम्ही शांती होम करण्याचा प्रस्ताव घेऊन व्यवस्थापनाकडे गेलो. त्यांच्या सूचनेनुसार महाशांती यज्ञाची प्रक्रिया पार पडली आहे. आता सर्व काही शुद्ध झाले आहे, असे पुजाऱ्यांनी जाहीर केले.
कसून चौकशीची जोरदार मागणी
तिरुपती मंदिरातील लाडूंच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. एसआयटीच्या अहवालाच्या आधारे कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जाहीर केले आहे. तसेच आता भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. प्रसादममध्ये प्राण्यांच्या चरबीच्या वापराची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी स्वामी यांनी केली आहे. तसेच राज्यसभा सदस्य आणि देवस्थानमचे माजी अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची मागणी केली आहे.