जोयडा तालुक्यातील उळवी येथे आज महारथोत्सव
कडक पोलीस बंदोबस्त : महारथोत्सवासाठी सुमारे 80 ते 90 हजार भाविक उपस्थित राहण्याची शक्यता
कारवार : जिल्ह्यातील जोयडा तालुक्यातील श्री क्षेत्र उळवी येथील श्री चन्नबसवेश्वर देवस्थानचा महारथोत्सव मंगळवार दि. 3 रोजी होणार आहे. महारथोत्सवाला सुमारे 80 ते 90 हजार भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून, रथोत्सवाच्या निमित्ताने कडक पोलीस बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कारवार जिल्हा पोलीस खात्याकडून देण्यात आली आहे. यात्रोत्सवाला 25 जानेवारीपासून पारंपरिक पद्धतीने उत्साहात सुरुवात झाली आहे. यात्रोत्सवाची सांगता 5 फेब्रुवारीला होणार आहे. यात्रोत्सवाला कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातून भाविक हजेरी लावत असतात.
उळवी येथे दाखल होणारे भाविक अद्यापही बैलगाडी वापर करतात. यावर्षी सुमारे 1200 बैलगाड्या, 800 ट्रॅक्टर उळवी येथे दाखल होण्याची शक्यता आहे. यात्रेकरुंच्या सुरक्षिततेसाठी सर्व शासकीय खात्यांच्या सहकार्यातून चोख व्यवस्था केली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उळवी येथे एक डीवायएसपी., एक पोलीस निरीक्षक, सहा पोलीस उपनिरीक्षक, जिल्हा सशस्त्र दलाची एक तुकडी, राज्य सखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या, 300 पोलीस कर्मचारी व 200 गृहरक्षक दलाचे जवान, तैनात केले आहेत. सरकारच्या निर्देशानुसार 100 सीसीटीव्ही, कमांड सेंटर, 10 एलईडी स्क्रीन्स, 5 मिनी वॉच सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनांसाठी पार्किंगची 8 ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. उळवी परिसरातून ड्रोनच्या माध्यमातून बारीक नजर ठेवली जाणार आहे.
तात्पुरते पोलीस आऊटपोस्ट
कायदा आणि सुव्यववस्थेसाठी तात्पुरते पोलीस आऊटपोस्ट उभारण्यात आले आहे. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून 4 रुग्णवाहिकांची आणि 4 वैद्यकीय तपासणी केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय एक अग्निशमन दल वाहनाची, दोन फायर बाईकची व्यवस्था करण्यात आली. भाविकांच्या सेवेसाठी सुमारे 150 स्वयंसेवक गणवेषात तैनात करण्यात आले आहेत.
पाच तपासणी नाक्यांची व्यवस्था
यात्रोत्सवाच्या निमित्ताने पाच तपासणी नाक्यांची व्यवस्था केली असून दांडेली उपविभागात समावेश होत असलेल्या तीन तालुक्यांमध्ये सोमवारी आणि मंगळवारी मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. पीक पॉकेटिंग आणि चेन स्नॅचिंग प्रकार टाळण्यासाठी शेजारच्या धारवाड-हावेरी आणि बेळगाव जिल्ह्यातील तज्ञ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आज सायंकाळी महारथोत्सव
मंगळवारी संध्याकाळी महारथोत्सव होणार असून, बैलगाड्यांना बुधवारी रात्री 11 नंतर परतीच्या प्रवासाला परवानगी देण्यात येणार आहे, असे पोलीस खात्यातर्फे कळविले आहे.