For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला अव्वल

07:05 AM Jan 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला अव्वल
Advertisement

प्रजासत्ताक दिन परेड : तिन्ही सेनादलांमध्ये  नौदलाचे पथक सर्वोत्तम

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सादर केलेल्या चित्ररथांच्या विजेत्यांची यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राने विजय मिळवला आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाने गणेशोत्सवातील आधुनिकता आणि परंपरेचे दर्शन घडवत उपस्थितांची मने जिंकली होती. या चित्ररथाच्या माध्यमातून स्वावलंबनाचा संदेशही देण्यात आला होता. परेडदरम्यान, पारंपरिक पोशाखातील महिलांच्या गटाने लेझीम लोकनृत्यही सादर केले. राज्यांच्या श्रेणीमध्ये जम्मू काश्मीर दुसऱ्या आणि केरळ तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

Advertisement

यावर्षी भारतीय नौदलाने तिन्ही सशस्त्र दलांमध्ये ‘सर्वोत्तम कवायत’ पथकाचा पुरस्कार जिंकला. या पथकात 144 युवा सैनिकांचा समावेश होता, असे नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या सैनिकांनी कर्तव्याच्या मार्गावर एकत्रितपणे मार्चिंग केले. हे प्रदर्शन भारताच्या वाढत्या सागरी शक्तीचे प्रदर्शन करते. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि इतर सहाय्यक दलांच्या श्रेणीमध्ये दिल्ली पोलीस दलाने सर्वोत्तम मार्चिंग पथक म्हणून निवड करण्यात आली. ‘वंदे मातरम्’च्या 150 वर्षांच्या वारशाचे सादरीकरण करणाऱ्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या चित्ररथाने मंत्रालये आणि विभाग श्रेणी जिंकली. या सर्व विजेत्यांचा पुरस्कार वितरण समारंभ 30 जानेवारी रोजी राष्ट्रीय स्टेडियम कॅम्प येथे होणार आहे.

‘जनतेची पसंती’मध्ये वेगवेगळ्या तुकडींना स्थान

‘लोकप्रिय पसंती’ श्रेणीमधील विजेत्यांचीही निवड जाहीर करण्यात आली आहे. ‘माय गव्हर्नमेंट’ पोर्टलवर केलेल्या ऑनलाइन पोलमध्ये, नागरिकांनी सशस्त्र दलांमध्ये आसाम रेजिमेंटला सर्वोत्तम मार्चिंग तुकडी म्हणून मतदान केले. पोलीस दलांमध्ये सीआरपीएलला सर्वाधिक मते मिळाली. राज्यांच्या श्रेणीत गुजरातच्या ‘वंदे मातरम’ चित्ररथाला सर्वाधिक पसंती मिळाली. त्यानंतर उत्तर प्रदेशचा बुंदेलखंड संस्कृती चित्ररथ आणि राजस्थानचा बिकानेर सुवर्ण कला चित्ररथलाही रसिकांनी दाद दिली. मंत्रालय श्रेणीमध्ये शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या चित्ररथाला सर्वाधिक मते मिळाली.

सांस्कृतिक मंत्रालयाकडूनही उत्कृष्ट सादरीकरण

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने ‘वंदे मातरम्’ची 150 वर्षे साजरी होत असल्यासंबंधीचा देखावा सादर केला होता. या चित्ररथात बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी केलेली गाण्याची रचना, एका प्रसिद्ध मराठी गायकाने केलेले वसाहतकालीन रेकॉर्डिंग आणि ‘जनरेशन झेड’चे प्रतिनिधित्व करणारा एक गट दाखविण्यात आला होता. ‘वंदे मातरम्’ या थीमवर आधारित या चित्ररथाच्या अग्रभागी वंदे मातरमच्या हस्तलिखिताची निर्मिती दर्शविली गेली. तळाशी असलेल्या पॅनेलवर चॅटर्जींची प्रतिमा होती. मध्यभागी पारंपरिक पोशाखातील कलाकारांचा एक गट होता, जो भारताची लोक विविधता दर्शवित होता. काहींनी आधुनिक पोशाखात ‘जनरेशन-झेड’चे प्रतिनिधित्व केले होते.

Advertisement
Tags :

.