महाराष्ट्राचा चंदीगडवर दणदणीत विजय
रणजी ट्रॉफेत महाराष्ट्राचा सलग दुसरा विजय : ब गटात अग्रस्थानी : ऋतुराज गायकवाड सामनावीर
वृत्तसंस्था/ चंदीगड
रणजी ट्रॉफी स्पर्धेत ब गटातील लढतीत महाराष्ट्राने चंदीगडचा 144 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह महाराष्ट्राला 6 गुण मिळाले असून गुणतालिकेत ब गटात संघ अव्वलस्थानावर आहे. या सामन्यात महाराष्ट्राने चंदीगडला 464 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना चंदीगडने चांगली लढत दिली. अर्जुन आझादने दीडशतकी खेळी करत झुंज दिली, पण इतर फलंदाजांनी निराशा केल्याने चंदिगडचा संघ दुसऱ्या डावात 319 धावांवर सर्वबाद झाला. महाराष्ट्राच्या विजयात ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, रामकृष्ण घोष आणि मुकेश चौधरी यांचा मोलाचा वाटा राहिला.
चंदिगढने दुसऱ्या डावात पहिली विकेट पहिल्याच षटकात शिवम भाम्ब्रीच्या रुपात गमावली होती. पण त्यानंतर अर्जुन आझादला कर्धार मनन वोहराची साथ मिळाली. या दोघांनी शतकी भागीदारी केली. मात्र मंगळवारी खेळ सुरु झाल्यानंतर मनन व्होराला 58 धावांवर घोषने बाद करत महाराष्ट्राला मोठे यश मिळवून दिले. त्याने 122 चेंडूच्या खेळीत 4 चौकार लगावले. मनन बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर रामकृष्ण घोषने रमण बिश्नोईलाही माघारी धाडले. त्यानंतर कोशिकने अर्जुनला काही काळ साथ दिली. पण त्याला दधेने 9 धावांवर बाद केले. यानंतर अर्जुनला राजअंगद बावाची साथ मिळाली. या दोघांनी शतकी भागीदारी करत महाराष्ट्राची चिंता वाढवली होती. पण, मैदानात जमलेल्या या जोडीला अनुभवी फिरकीपटू जलज सक्सेनाने धक्का दिला. त्याने 42 धावांवर बावाला बाद करत चंदीगडला मोठा धक्का दिला.
एका बाजूने विकेट पडत असताना दुसरीकडे अर्जुनने मात्र शानदार दीडशतकी खेळी साकारली. त्याने 236 चेंडूचा सामना करताना 17 चौकार आणि 6 षटकारासह 168 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. यानंतर 92 व्या षटकात मुकेशने अखेर सर्वात मोठा अडथळा ठरलेल्या अर्जुनला त्रिफळाचीत केले. अर्जुन बाद झाल्यानंतर चंदीगडचा दुसरा डाव लगेचच संपुष्टात आला. चंदीगडने दुसऱ्या डावात 319 धावा केल्या. महाराष्ट्राकडून मुकेश चौधरी आणि रामकृष्ण घोष यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या.
सामन्यावर महाराष्ट्राचेच वर्चस्व
तत्पुर्वी, या सामन्यात महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना 313 धावा केल्या होत्या. महाराष्ट्राकडून ऋतुराज गायकवाडने 116 धावांची खेळी केली. यानंतर चंदीगडला पहिल्या डावात 209 धावाच करता आल्या. यामुळे महाराष्ट्राला पहिल्या डावात 104 धावांची आघाडी मिळाली होती. यानंतर महाराष्ट्राच्या दुसऱ्या डावात पृथ्वी शॉ ने 222 धावांची खेळी केली. या जोरावर महाराष्ट्राने आपला दुसरा डाव 3 बाद 359 धावांवर घोषित केला आणि चंदीगडला विजयासाठी 464 धावांचे टार्गेट दिले.