अभिषेक बॅनर्जी यांना विदेशी जाण्यास मनाई
उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने धक्का
वृत्तसंस्था
कोलकाता
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. वैद्यकीय उपचारांसाठी परदेशात जाण्याची परवानगी मागितलेली त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालय ही वैद्यकीय तज्ञ संस्था नसल्यामुळे या प्रकरणावरील निर्णय केवळ डॉक्टरांच्या मतानुसारच घेतला जाऊ शकतो, असे सांगत न्यायालयाने बॅनर्जी यांना एसएसकेएम रुग्णालयाच्या तज्ञ मंडळासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने एसएसकेएम रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागाच्या प्रमुखांना तीन सदस्यीय तज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. ही समिती गुरुवारी दुपारी 2 वाजता बॅनर्जी यांची तपासणी करून न्यायालयाला संपूर्ण वैद्यकीय अहवाल सादर करेल.
आवश्यक नेत्रोपचार भारतात शक्य नाही असे अहवालात नमूद झाल्यासच परदेश प्रवासाच्या परवानगीचा विचार केला जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. अभिषेक बॅनर्जी यांचे प्रतिनिधित्व करण्राया ज्येष्ठ वकील रेबेका जॉन यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. बॅनर्जी यांना त्यांच्या डाव्या डोळ्याच्या विशेष उपचारांसाठी तीन आठवड्यांसाठी परदेशात जाण्याची गरज आहे, जे उपचार जॉन्स हॉपकिन्स मेडिसिनमध्ये आधीच सुरू आहेत. प्रत्येक नागरिकाला स्वत:च्या उपचारांसाठी वैद्यकीय सुविधा-डॉक्टर्सची निवड करण्याचा अधिकार असल्याचा दावा त्यांनी न्यायमर्तींसमोर केला. मात्र, याचदरम्यान, राज्याचे अतिरिक्त महाधिवक्ता राजदीप मजुमदार यांनी याचिकेला कडाडून विरोध केला. अभिषेक बॅनर्जी यांच्यावर 15 फौजदारी खटले आणि बिधाननगर सायबर गुन्हेगारी प्रकरण आहे. त्यांनी सादर केलेल्या वैद्यकीय कागदपत्रांमध्ये उपचार तातडीचे असल्याचे नमूद केलेले नाही, असेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. बिधाननगर प्रकरणात तक्रारदाराचे प्रतिनिधित्व करणारे वकील विक्रम बॅनर्जी यांनीही आक्षेप घेत 4 जूनच्या वैद्यकीय नोंदींमध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या नोंदणी क्रमांकाचा उल्लेखही नसल्याचे दाखवून दिले.